Monday, January 26, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ११ डिसेंबर २०२५ - निमित्त उलूक महोत्सवाचे

संपादकीय : ११ डिसेंबर २०२५ – निमित्त उलूक महोत्सवाचे

समाजाच्या तळागाळात रुजलेल्या अनिष्ट अंधश्रद्धांचा विळखा सैल करण्यासाठी आणि वैज्ञानिक रुजवण्यासाठी अभिनव मार्गानी प्रयत्न करत राहण्याला सध्या तरी पर्याय नाही. अंधश्रद्धा केवळ माणसांचे जगणे प्रभावित करते असे नाही, तर घुबडासारख्या प्राण्याच्या गळ्याचा अकारण फासदेखील बनते. घुबडाला अशुभ प्राणी मानले जाते. घुबडाला डोळे फिरवता येत नाहीत. त्यामुळे ते आजूबाजूला बघण्यासाठी संपूर्ण डोके गरगरा गोलगोल फिरवते. त्याचे डोळे मोठे आणि माणसाच्या नजरेत भरणारे असतात. त्याला रात्री दिसते. त्यामुळे शिकार करण्यासाठी ते रात्री बाहेर पडते. म्हणूनच कदाचित ते दिसले तर काहीतरी विपरीत घडण्याच्या भीतीने माणसे अस्वस्थ होतात.

- Advertisement -

स्वतःच्या रक्षणासाठी ते वेगवेगळे आवाज, भयावह आवाज काढते, असे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याच आशयाच्या अनेक कहाण्या समाजाच्या कानाकोपर्‍यात ऐकायला मिळतात. याच आशंकेने आणि काळ्या जादूच्या अफवेमुळे घुबडांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. घुबडाचे दर्शन माणसे अशुभ मानतात. वास्तविक तो माणसाचा, विशेषतः शेतकर्‍यांचा मित्र. साप, उंदीर आणि काही विशिष्ट प्रकारचे किडे हे त्याचे भक्ष्य म्हणजेच अन्न आहे. ज्यांना शेतकर्‍यांचे शत्रू मानतात. शेती पोखरणारे प्राणी खाऊन तो समाजावर एकप्रकारे उपकारच करतो. पण ज्ञानाअभावी माणूस त्याची परतफेड अपकाराने करतो.

YouTube video player

घुबड उपयोगी असतानाही त्याच्याविषयी गैरसमज पसरवणार्‍या कहाण्या प्रसिद्ध कशा? याचे उत्तर देताना अरण्यऋषी मारुती चितमपल्ली सांगतात, त्याला माणसाने हानी पोहोचवू नये असाच त्यामागचा उद्देश आहे. तथापि माणूसच त्याचा काळ बनताना आढळतो. वर्षाकाठी भारतात हजारो घुबडांची माणसे शिकार करतात. घुबडाचा जीव धोयात आणणार्‍या गैरसमजांची आणि अंधश्रद्धांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी इला फाऊंडेशनने स्वयंस्फूर्त पुढाकार घेतला आहे. संस्था दरवर्षी ‘उलूक महोत्सव’ भरवते. उलूक म्हणजे घुबड. यावर्षीच्या महोत्सवाला सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. निसर्गसाखळीतील घुबडाचे अस्तित्व आणि महत्त्व समजावून घेतले. ही अशा महोत्सवाची प्रमुख उपलब्धी मानली जाऊ शकेल. केवळ घुबडाचेच नव्हे तर अशा अनेक अंधश्रद्धा माणसाचे जगणे हराम करतात. माणसाचे दैनंदिन जगणे व्यापून असतात. महत्त्वाचे म्हणजे माणसाची विचारक्षमता बाधित करतात.

माणसे विचार करेनाशी होतात. तर्कशक्तीला तिलांजली देतात. ‘नवसे पुत्र होती.. मग का करणे लागे पती’ असा प्रश्न संत तुकाराम महाराजांनी विचारला आहे. तरीही संतानप्राप्तीसाठी माणसे तथाकथित बाबाबुवांच्या कच्छपी लागतात. त्यांच्या पत्नीला सहज एखाद्या भोंदूच्या आश्रमात काही काळासाठी सोडून जाऊ शकतात. दुर्दैवाने असे स्वयंघोषित बाबाबुवा धर्मातीत आढळतात. अशाच अंधश्रद्धा आणि जातीपातींवरून जातपंचायती दहशत माजवतात. अशा संकेतांची आणि अंधश्रद्धांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाईल. त्यांचा पराभव करण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. कायद्याची अंमलबजावणी अधिकाधिक प्रभावी व्हावी यासाठी सामाजिक संस्था जोरकस प्रयत्न करतात. सरकारवर दबाव आणतात. त्याबरोबरीने समाजात आणि युवा पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे आहे. उलूक महोत्सव हा त्याचा एक भाग मानला जाऊ शकेल. असे महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न ठरतात. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे युवांना प्रश्न पडू शकतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू ते शकतात.

उत्तराचा शोध त्यांना पुस्तके आणि जाणत्यांपर्यंत घेऊन जाऊ शकेल. ते विचार करू लागतील. तर्कशक्तीच्या कसोटीवर मुद्दे घासून बघण्याचा प्रयत्न करू लागतील. यामुळेच त्यांच्यात चांगल्या-वाईटाची समज वाढेल. विचारबुद्धीला चालना जगणे सुकर करण्याचा एक मार्ग ठरू शकेल. काही व्यक्तींनी घुबड या विषयावर पीएच.डी प्राप्त केली आहे. अशी वैचारिक जागरुकता अनेक पातळ्यांवर अत्यावश्यक आहे. जागरुक व्यक्ती अंधश्रद्धा आणि भेदाभेदाच्या राजकारणाला बळी देऊ शकेल. समाजातील भेदाभेद माणूसकीचा गळा घोटतात हे त्यांच्या लक्षात येऊ शकेल. भेदाभेदांच्या राजकारणामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्था धोयात येण्याचे प्रसंग वारंवार उद्भवतात. पण जागरुक युवा त्यांच्या फशी पडत नाहीत. चांगल्या समाजबदलाची प्रक्रिया संथच असते. त्याची सुरुवात मात्र व्हावी लागते. असे महोत्सव किंवा अभिनव मार्गांनी केले जाणारे प्रयत्न त्याचे निमित्त ठरतात. म्हणून समाज त्यांचे स्वागतच करतो.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...