भारतीय क्रिकेट संघाने गाजवलेला पराक्रम लोकांच्या कायम स्मरणात राहील. आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकून संघाने 12 वर्षांचा दुष्काळ संपवला. संघाने हा चषक 2013 साली जिंकला होता. अंतिम सामन्याने प्रेक्षकांना आनंद तर दिलाच पण कितीही संकटे आली तरी स्वप्नांचा पाठलाग करणे सोडू नका, हा संदेश देशातील युवांना दिला. त्यांच्या खेळीची संघाला अत्याधिक गरज असताना संघातील प्रत्येक खेळाडू कधी ना कधी शुन्यावर बाद झाला आहे. जसा विराट कोहली अंतिम सामन्यात बाद झाला. प्रत्येकाने आयुष्यात निराशेचा, मानसिक आंदोलनांचा, नाकारले जाण्याचा, संघातून बाहेर काढले गेल्याचा सामना केला आहे.
काहींच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. ती चव्हाट्यावरदेखील आली. काहींना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर टीका सहन करावी लागली. अतिआत्मविश्वासामुळे काहींचे क्रिकेटमधील भविष्य संकटात सापडले. उद्ध्वस्त होऊन आयुष्य पणाला लावण्यासाठी आणि सगळे सोडून निराशेच्या गर्तेत जाण्यासाठी ही कारणे पुरेशी ठरावीत. पण संघातील सगळ्या खेळाडूंची मूस वेगळी असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवले. अंतिम सामन्यात काय नव्हते? टोकाचा मानसिक दबाव होता. तमाम भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे होते. विजय-पराजयाचा तराजू सतत झुलत होता. काही चुकाही घडल्या पण त्याची किंमत संघाला मोजावी लागू नये यासाठी सगळेच धडपडले. संघभावनेचा आविष्कार घडवला.
नेतृत्वावर सर्वांनी कमालीचा विश्वास दाखवला. त्याचे त्याचे संघातील स्थान आणि त्याची जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येकाने खेळ केला. संयम, सहनशीलता, समर्पण आणि जिंकण्याचा निर्धार याचे दर्शन घडवले. संघाने विजयाचे स्वप्न पाहिले होतेच पण त्याच्या पूर्ततेचा आराखडादेखील तयार केला होता. न्यूझीलंडच्या खेळाडूंची पद्धत, त्यांच्या खेळातील जमेच्या बाजू आणि उणिवा यांचा विचार करून भारताच्या संघातील खेळाडूंचे नियोजन केल्याचे सगळ्याच खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रियेत सांगितले.
सगळेच क्रिकेट खेळाडू देशातील युवांचे हिरो आहेत. पण बहुसंख्य युवा निराशेच्या गर्तेत सापडतात. मानसिक विकारांनी ग्रस्त होतात. संकटांपुढे हार मानतात. काहीजण आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात. तथापि आयुष्याचे ध्येय ठरवा, स्वप्ने बघा, त्यांचा पाठलाग करा, त्यांच्या पूर्ततेसाठी क्षमता कमवा, शिस्त अंगी बाणवा, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. अपयश आले तरी स्वप्ने पाहणे सोडू नका हाच संदेश प्रत्येक खेळाडूने देशातील युवांना दिला. त्यातला मतितार्थ युवा प्रेक्षक लक्षात घेतील का?