‘आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही. नफा हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. देश आणि समाजाचे कल्याण आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे’ असा उदात्त विचार सांगणारे टाटा उद्योग समूहाचे अर्ध्वयू रतन टाटा यांनी बुधवारी रात्री जगाचा निरोप घेतला. टाटा आज हयात नसले तरी उदात्त विचारांचा अक्षय वारसा ते मागे ठेवून गेले आहेत.
ध्येयवादी आणि निश्चयी टाटांची उद्योग जगतातील कारकीर्द दोन दशकांहून अधिक काळाची! त्यांच्या कारकिर्दीत टाटा उद्योग समूहाने प्रगतीची मोठी गरूडझेप घेतली. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. जगातील शंभर देशांत टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला. अनेक युरोपियन कंपन्या खरेदी करून त्यांनी टाटा समूहात आणल्या. टाटा समूहाला वैश्विक चेहरा प्राप्त करून दिला. जेवणाचा स्वाद वाढवणार्या मिठापासून लहान-मोठ्या वाहननिर्मितीत टाटा समूहाने पाऊल ठेवून ते यशस्वी केले. रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्राचा प्रमुख चेहरा होते.
‘टाटा’ या नावाला त्यांनी गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक बनवले. उद्योग समूहात कौटुंबिक आपलेपणा आणला. ‘टाटा’ नाव आज गावोगावी आणि खेडोपाडी पोहोचले आहे. ही किमया रतन टाटांनी आपल्या कुशल नेतृत्वाने घडवली. टाटा उद्योग समूहाला जागतिक उंचीवर नेताना भारताच्या औद्योगिक विकासातही भरीव योगदान दिले. एखाद्या उद्योजकाला जनसामान्यांचे भरभरून प्रेम मिळणे ही तशी दुर्मिळ गोष्ट! टाटांना जनसामान्यांचे प्रेम भरभरून मिळाले. स्वप्न पाहणे हा मानवी स्वभाव आहे. सामान्य माणसे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहतात. रतन टाटांनादेखील मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्णत्वास नेण्याची आवड होती.
मोठ्या स्वप्नांबरोबरच सामान्यांच्या स्वप्नांचीही त्यांना जाणीव होती. मध्यमवर्गीयांना स्वत:च्या कारमधून फिरता यावे, कार खरेदी त्यांच्या आवाक्यात यावी व कारचे त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून एक लाखातील ‘नॅनो’ कारचे मानवतावादी स्वप्न टाटांनी पाहिले आणि वास्तवात उतरवले. नॅनो प्रकल्प उभारताना त्यांनी फायद्या-तोट्याचे गणित पाहिले नाही. मध्यमवर्गीयांच्या चेहर्यावरील आनंद त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. उद्योगनगरी मुंबईच्या कुशीत जन्मलेल्या रतन टाटांचे व्यक्तिमत्त्व शांत, संयमी, धाडसी, प्रेमळ आणि सदैव हसतमुख होते.
मोठ्या उद्योग समूहाचा भार ते पेलत असले तरी त्याचा ताण त्यांच्या चेहर्यावर कधी जाणवत नसे. ख्यातनाम उद्योगपती असूनही सर्वसामान्य जीवन जगणे त्यांनी पसंत केले. दुमजली घरात राहून त्यांनी कामकाज केले. समूहातील सेवकांशी त्यांचा व्यवहार आपुलकीचा होता. शिपाई, वाहनचालक यांनाही ते आदराने वागवत. मुक्या प्राण्यांवर त्यांचे निस्सिम प्रेम होते. ‘बॉम्बे हाऊस’ हे टाटा उद्योग समूहाचे मुख्यालय! रतन टाटा तेथे जात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कोणतीही धावपळ होत नसे. त्यांच्या येण्याचा सार्वधिक आनंद त्यांच्या प्रिय श्वानांना होत असे. आपण जागतिक ख्यातीचे उद्योगपती आहोत, हा अभिनिवेश न बाळगता ते श्वानांना प्रेमाने कुरवाळत. कोण काय म्हणेल याची त्यांना अजिबात फिकीर नसे. उद्योगात जोखीम स्वीकारायला ते सदैव सज्ज असत.
दोनच दिवसांपूर्वी नियमित आरोग्य तपासणीसाठी रतन टाटा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांत आल्या होत्या. ‘आपण ठणठणीत आहोत, अफवांवर विश्वास ठेऊ नका’ असे आवाहन त्यांनी लगेचच समाज माध्यमांवरून करून चाहत्यांना दिलासा दिला होता. समाजातून मिळवलेले समाजाला परत केले पाहिजे, असा त्यांचा प्रगल्भ विचार होता. तो त्यांनी कृतीत उतरवला.
आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. माणुसकी जपणारा उद्योगपती म्हणून ते सदैव जनसामान्यांच्या मनात कायम विराजमान राहतील. सच्चा देशभक्त आणि दानशूर उद्योगपती असलेल्या टाटांच्या जाण्याने देशाने एक ‘अनमोल रत्न’ गमावले आहे, पण ‘लिजंडस् नेव्हर डाय’ असे म्हणतात. टाटांच्या बाबतीत ते तंतोतंत खरे ठरते. भारताच्या या रत्नाला ‘देशदूत वृत्त समूहा’ची विनम्र आदरांजली!