अनंत अंबानी यांची पदयात्रा सध्या चर्चेत आहे. जामनगर ते द्वारका अशी 170 किलोमीटरची त्यांची पदयात्रा नुकतीच पूर्ण झाली. भारतासारख्या खंडप्राय देशात पदयात्रा नवीन नाहीत. तथापि पदयात्रांच्या आखीव-रेखीव ढाच्याच्या पलीकडे जाऊन अनंत यांच्या पदयात्रेकडे पाहिले जाऊ शकेल. अनंत यांना एक दुर्मिळ हार्मोनल विकार आहे. परिणामी स्थूलता, अस्थमा आणि फुफ्फुसांचे विकार त्यांना अधूनमधून त्रस्त करतात. त्यावर मात करत त्यांनी पदयात्रेचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला.
त्यांच्याबरोबर असणार्या ताफ्याचा आणि त्यांच्याभोवतीच्या वलयाचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून पदयात्रा रात्रीच काढली जायची, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यांच्यातील याच संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा परिचय लोकांना ‘वनतारा’ वन्यजीव प्रकल्पाच्या ध्वनिचित्रफितीतून नुकताच झाला. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये अंबानी कुटुंबियांचा समावेश आहे. त्यामुळे पदयात्रा काढणे, प्राणिसंग्रहालय काढणे किंवा ठरवले तर काहीही करणे अशक्य नाही अशी सार्वत्रिक भावना असणेही अत्यंत स्वाभाविक मानले पाहिजे. आर्थिकतेचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर पैसा हेच उत्तर असू शकेल का? किंवा कोणाच्याही कोणत्याही गोष्टीची तुलना फक्त पैशांशी करणे योग्य ठरू शकेल का? स्वप्नपूर्तीसाठी पैशाशिवाय अनेक गुण आवश्यक असतात.
त्यासाठी उच्च ध्येय असलेली स्वप्ने पाहावी लागतात. त्यांचा पाठलाग करावा लागतो. त्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करावा लागतो. चिकाटी ठेवावी लागते. मार्गात येणार्या संकटांचा सामना करण्याची जिद्द बाळगावी लागते. अभ्यास करावा लागतो. इच्छाशक्तीही महत्त्वाचीच असते. हे गुण पैशांनी विकत मिळत नाहीत. ते अंगभूत असावे लागतात. अंगी बाणवावे लागतात. त्यासाठी ती व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब असावी लागते असे नाही. त्याच्याच बळावर ते पदयात्रा पूर्ण करू शकले. वनतारा उभारू शकले. पंतप्रधानांना वनतारा दाखवताना अनंत यांचाही त्या क्षेत्रात किती अभ्यास आहे हे दर्शकांच्या लक्षात आले असू शकेल. त्याशिवाय इतका मोठा प्रकल्प चालवणे शक्य होऊ शकेल का? युवा पिढीने हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. दुसर्याची टिंगल किंवा संभावना करणे, खिल्ली उडवणे सोपे असते. अवघड असते ते ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करणे आणि तशी क्षमता अंगी बाणवणे. हेच यावरून लक्षात घेण्यासारखे आहे. या क्षमतांची सध्या युवा पिढीला नितांत गरज आहे.