पॅरिस ऑलिंपिकचा आज समारोप होत आहे. यंदाच्या ऑलिंपिकने भारतीयांनी अनेक धडे घेण्याची गरज अधोरेखित केली. देशाने किती पदके मिळवली, खेळाडूंचे कर्तृत्व याचे कवित्व काही काळ रंगत राहील. रंगायलाही हवेच. कारण त्यांचा पराक्रम हा तमाम भारतीयांच्या अभिमानाचा विषय आहे.
जे खेळाडू मायदेशी परत आले त्यांचे स्वागत म्हणूनच जोरदार झाले. काही खेळाडूंचे प्रदर्शन वादाच्या भोवर्यात सापडले. त्याची दखल कशी घ्यायची किंवा नाही हा त्या-त्या खेळाच्या संघटना आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय आहे. तथापि समाज म्हणून अजूनही वैचारिक परिपक्वता दाखवण्यात कमी पडतात का? यावर विचार व्हायला हवा का? केवळ समाजमाध्यमाचे व्यासपीठ उपलब्ध आहे म्हणून मन मानेल त्या भाषेत लोकांनी बोलावे का? पदकविजेता खेळाडू घडणे ही दीर्घकालीन आणि विलक्षण गुंतागुंतीची प्रक्रिया असते हे सारेच मान्य करतील.
त्या प्रक्रियेत खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकांच्या शारीरिक आणि मुख्यत्वे मानसिकतेचा कस अनेक वेळा लागतो. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवलेल्या आणि पदक न मिळवलेल्या अनेक खेळाडूंच्या ज्या कहाण्या प्रसिद्ध झाल्या; त्या हेच दर्शवतात. अत्युच्च स्पर्धेत पदक मिळवणे तिथे जाणार्या प्रत्येक खेळाडूंचे स्वप्न असते. त्यासाठी तो अनेक आव्हाने पेलतो. जीवतोड मेहनत घेतो. पदक मिळणे-न मिळणे याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. खेळाडूंच्या प्रदर्शनाविषयी मते व्यक्त करताना त्याचा आदर आणि भान राखण्याची अपेक्षा गैर मानली जाईल का? लोकांनी मिळून समाज बनतो आणि खेळाडू त्याचाच एक भाग आहेत याचा विसर पडून कसे चालेल? त्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जसा आम जनतेला मिळतो तसा खेळाडूंनाही मिळतोच.
खेळाडू घडण्याच्या पद्धतीचा समाज एक महत्वाचा घटक असतो. सामाजिक प्रेरणा खेळाडूला लक्ष्यप्राप्तीसाठी प्रेरकच ठरते. याच खेळाडूंकडून युवा प्रेरणा घेतात. खेळ हेच ध्येय बनवण्याचे स्वप्न बघू शकतात. उत्तम माणूस घडण्यात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व वेगळे सांगायला नको. समाजाला सुजाण नागरिकत्वाची आवश्यकता असते हे सारेच जाणून आहेत. तात्पर्य, कोणत्याही सामाजिक घटना असोत किंवा परिस्थिती; समाज म्हणून वैचारिक परिपक्वतेला अजून नक्कीच वाव आहे. हा धडा पॅरिस ऑलिंपिकने घालून दिला असेल का?