Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : १२ डिसेंबर २०२४ - ज्येष्ठांचा स्वागतार्ह पुढाकार

संपादकीय : १२ डिसेंबर २०२४ – ज्येष्ठांचा स्वागतार्ह पुढाकार

जागतिक स्तरावर भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. याच युवाशक्तीच्या बळावर ‘विश्वगुरू’ होण्याचे स्वप्न देशाने पाहिले आहे. तथापि या नाण्याच्या दुसर्‍या बाजूकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न अभ्यासक करत आहेत. आगामी काळात समाजात ज्येष्ठांची संख्या वाढत जाणार आहे. 2050 पर्यंत भारतातील वयोवृद्धांची संख्या सुमारे 35 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या भारतातील प्रमुखांनी नुकताच व्यक्त केला. हे वास्तव देशातील संशोधकही जाणून असावेत.

तात्पर्य, जसजशी ज्येष्ठांची संख्या वाढत जाईल तसतशा त्यांच्यापुढील समस्याही वाढत जाऊ शकतील हे वास्तव आहे. वयोवृद्धांच्या वाढत्या संख्येनुसार सरकारी पातळीवर विविध योजना आखल्या जाऊ शकतील. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्याला त्यात प्राधान्य दिले जाऊ शकेल. त्यांच्यासाठी सरकारी आणि सामाजिक संस्थांच्या हेल्पलाईन चालवल्या जातात. अनेक सामाजिक संस्था त्यांच्यासाठी कार्यरत आढळतात. सध्याही अनेक सरकारी योजना ज्येष्ठांना विविध पातळीवर सहाय्यभूत ठरताना आढळतात. तथापि विविध कारणांमुळे येऊ शकणारे एकटेपण ही त्यातील भेडसावणारी मुख्य समस्या आहे.

- Advertisement -

जिचा सामना सध्यादेखील अनेक ज्येष्ठ करतात. मुले परदेशात किंवा नोकरीच्या गावी स्थायिक झाल्याने त्यांच्या माता-पित्यांना एकटे राहावे लागते. अनेक शहरांमधील अनेक वसाहतींमध्ये ही वस्तुस्थिती आहे. वृद्धाश्रमात जाऊन राहणे हा पर्याय सर्वांसाठीच उपलब्ध असू शकेल असे नाही. एकटेपणावर मात करण्याचा प्रयत्न अनेक ज्येष्ठ त्यांच्या परीने करतात. पण त्या पुढाकाराची धाव सकाळ-संध्याकाळ कट्ट्यावर जमण्यापर्यंतच आढळते. तथापि एकटेपणावर मात करण्याचे अजूनही मार्ग सापडू शकतात हे केरळमधील काही ज्येष्ठांच्या उदाहरणावरून लक्षात यावे. केरळ कोट्टायम परिसरातील काही ज्येष्ठ एकत्र आले. त्यांनी ज्येष्ठांचे एक नवे गाव वसवले.

दोन खोल्यांचे घर आणि सामुदायिक स्वयंपाकघर असे गावाचे सध्याचे स्वरूप आहे. सगळे एकमेकांना धरून आणि सांभाळून राहतात. मदतीसाठी जशी जमेल तशी तत्परता दाखवतात, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. त्या गावाची गाथा नुकतीच माध्यमांत प्रसिद्ध झाली. अर्थात आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांना हा मार्ग काढणे शक्य झाले, असा आक्षेप घेतला जाऊ शकेल. तो नाकारता येणार नाही. तथापि त्यातील मर्म लक्षात घेतले जायला हवे. कोणावरही दोषारोप न करता किंवा जबाबदार न धरता परिस्थिती मनापसून स्वीकारून त्यावर आपापल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हे मर्म आहे.

हा दृष्टिकोन कुटुंबातील ज्येष्ठांचे आणि त्यांच्या वारसदारांचे एकत्र राहणे सुसह्य करू शकेल. अन्यथा अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठांना जमवून घेता येत नाही, अशी तक्रार त्यांची मुले करताना आढळतात. अट्टाहास, हट्टाग्रह, न विचारता सल्ले देणे आणि मुलांचे सल्ले न ऐकणे या काही सामान्य तक्रारी आढळतात. त्या सरसकट नाकारल्या जाऊ शकतील का? कुटुंबातील दोन्ही पिढ्यांची लवचिकता त्यांची कुटुंबसंस्था पुढे नेऊ शकेल. एकटेपणाही टळू शकेल. याची जबाबदारी चार पावसाळे जास्त पाहिलेल्या ज्येष्ठांवर अधिक असू शकेल का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...