Wednesday, January 7, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १२ जुलै २०२५ - तुका म्हणे ऐशा नरा…

संपादकीय : १२ जुलै २०२५ – तुका म्हणे ऐशा नरा…

लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य, ही लोकशाहीची समाजमान्य व्याख्या अनेक लोकप्रतिनिधी धाब्यावर बसवतात. कधीकाळी भारतात अस्तित्वात असलेली सरंजामशाही प्रजासत्ताकात खालसा झाली असे आतापर्यंत वाटत होते. पण अनेक राजकारण्यांच्या मनात ती अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय लोकांना अधूनमधून येतो. विजयाचा ठप्पा पडला की, जनता बिचारी त्यांची रयत आणि ते रयतेचे राजे अशा गुर्मीत वावरतात. त्यातीलच काही नमुन्यांचे हे प्रताप.

- Advertisement -

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना त्यांच्या बंधूंसह काही बगलबच्यांना पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची विशेष व्यवस्था हवी होती. त्यांनी तशी मागणीच केली होती. इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिका अधिकार्‍याला तर मुंबईत आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचार्‍याला मारहाण केली. कायदा निर्माण करण्याची जबाबदारी असणार्‍यांना कायदा हातात घ्यायची हिंमत येते कुठून? सरंजामदारांच्या अरेरावीत कोणताही पक्ष अपवाद नाही. सगळीकडे ‘उडदामाजी काळे गोरे..’ अशीच परिस्थिती जनतेच्या अनुभवास येते.

YouTube video player

ज्या संविधानाचा उदो उदो सगळेच राजकारणी करतात त्या संविधानाने जनतेला दिलेल्या मूलभूत अधिकारांचा सोयीस्कर विसर मात्र सार्‍यांना पडतो. कारण काहीही असले तरी दुसर्‍याच्या कॉलरला हात घालून आपण त्याच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली करत आहोत, हेही अशांच्या लक्षात येत नाही, इतकी सरंजामशाही रक्तात भिनलेली आढळते. बरे हा उर्मटपणा त्यांच्यापुरताच मर्यादित राहत नाही. तो कार्यकर्त्यांमध्येदेखील झिरपतो. कायदा मोडला तरी त्यांच्यावर कारवाई करू नये, त्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवू नयेत, रांगेत उभे राहायला लावू नये, वापरलेल्या सेवांचे मूल्य कोणी मागू नये, पोलिसांनी त्यांना सलाम ठोकावा असेच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटायला लागते.

जनतेच्या मनावर जो राज्य करतो तो खरा लोकप्रतिनिधी असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात. तथापि अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याच मनाचा कारभार करतात. सत्तेची ऊब मनातील सरंजामशाहीला खतपाणी घालते. सत्तेपुढे सारे फिके वाटायला लागते आणि जनता बिचारी जिथे आहे तिथेच राहते. ‘तुका म्हणे ऐशा नरा…’ अशीच उपरोक्त करणी आहे. त्याचा दोष लोकांना तरी कसा दिला जाऊ शकेल? दोन वेळच्या जेवणाची तजवीज करण्यातच लोकांचा वेळ जातो. लोक पक्षधुरिणांकडे अपेक्षेने पाहतात. पण त्याबाबतीतही घोर निराशाच पदरी पडण्याची शक्यता जास्त. तेव्हा, जनतेसाठी आलीया भोगासी… अशीच परिस्थिती आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...