देशातील बहुसंख्य युवांवर रिल्सचे गारुड आढळते. रिल्स आणि त्याला लाईक्स मिळवण्याच्या नादात कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळत आहोत याचेही लोकांचे भान सुटत आहे. प्रसंगी जीवही धोक्यात घालायला युवा मागे पुढे पाहात नाहीत अशा घटना सातत्याने उघडकीस येतात. चॅम्पियन्स चषक विजयाचेच उदाहरण घेता येऊ शकेल. देशातील युवांनी प्रेरणा घ्यावी असाच खेळ भारतीय संघाने चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यात केला. विक्रमी विजयानंतर बहुसंख्य खेळाडूंचे कुटुंबीय मैदानावर आले होते. तेव्हा कोहली शमीच्या आईच्या पाया पडला. त्याचे कौतुक करणारे व्हिडीओ फिरत आहेत. तथापि त्याच संघाचा विजय साजरा करताना मात्र बहुसंख्य युवांनी बेफाम उन्मादाचे दर्शन घडवले.
नाशिकमध्ये ठिकठिकाणी हजारोंची गर्दी झाली होती. काहींनी अंगातील कपडे फाडले. गाड्यांच्या टपावर चढून अंगविक्षेप केले. उन्माद इतका टोकाला गेला होता की, त्यांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे आग लागली. ती आग विझवण्यास जाणार्या अग्निशामक दलाच्या गाडीला वाट करून देण्याऐवजी ती गाडी गर्दीने अडवली. त्या गाडीवर चढून अंगविक्षेप केले. त्याचे रिल्स फिरत आहेत आणि या भयंकर चुकांचे समर्थन आणि उदात्तीकरण केले जात आहे. मिरज, पुणे आणि इंदूरमध्ये जमावात हाणामारी झाली. खेळ जीवनकौशल्य शिकवतो असे मानले जाते. खेळाडूंनी देखील त्याचेच प्रदर्शन घडवले. पण त्यांना हिरो मानणार्या युवांनी मात्र रिल्स काढण्यावर भर दिला.
रिल्स आणि लाईक्सच्या व्यसनातून युवांना बाहेर कसे काढायचे हा गंभीर प्रश्न आहे. ज्याचे लाईक्स आणि फॉलोअर्स जास्त त्याला सरार्स रीलस्टार संबोधले जाते. तो कोणत्या प्रकारचे, काय संदेश देणारे रिल्स बनवतो याला काडीइतकेही महत्त्व दिले जात नसल्याचे आढळते. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणार्या त्यांच्या मुलाखती या वेडाचाराला अजूनच चमकदार बनवतात. त्यांना मिळणार्या पैशांच्या कहाण्या तिखटमीठ लावून सांगितल्या जातात आणि युवा त्याच्यामागे धावत सुटतात. असा हा सगळा मामला आहे. वास्तविक लोकांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता लक्षात घेऊन सकारात्मक रिल्स देखील बनवले जाऊ शकतील. रिल्सला सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनवले जाऊ शकेल.
मनोरंजन हा देखील एक उद्देश असू शकेल. पण मनोरंजनाची व्याख्या समजली पाहिजे. तिचा अभाव आढळतो. कारण बहुसंख्यांना झटपट लोकप्रियता हवी असते. त्यामुळेच जीव धोक्यात घालून, द्वयर्थी संवाद म्हणून किंवा अंगविक्षेप करणारे रिल्सच बनवण्याकडे कल वाढतो. या व्यसनातून बाहेर कसे पडायचे आणि समाजोपयोगी कसे बनायचे याचे अनेक मार्ग तज्ज्ञ सुचवतात. पण ते पाहिजेत कोणाला, हा खरा प्रश्न आहे.