Tuesday, December 3, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १२ नोव्हेंबर २०२४ - बुद्धी गहाण, त्याला कोण काय करणार?

संपादकीय : १२ नोव्हेंबर २०२४ – बुद्धी गहाण, त्याला कोण काय करणार?

समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ खूप गाजत आहे. तसेही या माध्यमावर सतत कुठले ना कुठले व्हिडिओ गाजत आणि फिरत असतात. सध्या फिरत असलेला व्हिडिओ लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरावा. तो बहुधा आंध्र प्रदेशमधील एका रेल्वे स्टेशनवरचा असावा. तसा प्रसंग कुठल्याही स्टेशनवर घडू शकेल. एक आजोबा रेल्वेरूळ ओलांडत होते. समोरून एक रेल्वेगाडी येत होती. तरीही त्यांनी ते धाडस केले. त्यांच्या नशिबाने त्यांची आणि गाडीची गाठभेट अगदी सेकंदाने हुकली आणि त्यांचा जीव वाचला.

व्हिडिओ बघताना प्रेक्षकांच्या अंगावरदेखील काटा उभा राहतो. उत्तर प्रदेशमधील दोन युवकांनी याही पुढचे धाडस केले. रेल्वेगाडी येत असतानादेखील त्यांनी दुचाकीवरून रेल्वेरूळ पार करण्याचा प्रयत्न केला. त्यांचाही अपघात असाच काही सेकंदांनी टळला, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावर्षीच्या जानेवारी ते जून महिन्यात मध्य रेल्वेमार्गावर 363 आणि पश्चिम रेल्वेमार्गावर 233 प्रवाशांचा रेल्वेरूळ ओलांडताना मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांच्या अहवालात हा निष्कर्ष नमूद असल्याचे वृत्त माध्यमांत आले आहे. रूळ ओलांडू नका, असे आवाहन रेल्वे सातत्याने करते.

- Advertisement -

लोकांच्या बेफिकीर वृत्तीचा असाच अनुभव पर्यटनस्थळांवर, समुद्रकिनार्‍यांवर, गडकिल्ल्यांवर, रस्त्यांवर वाहने चालवताना येतो. लोकांना त्यांच्या जीवाचीदेखील पर्वा नसल्याचे आढळते. नियमांना हरताळ फसण्याची वृत्ती माणसांचा जीव धोक्यात आणते हे वारंवार अनुभवास येते. तरीही माणसे नियम मोडतात. नियम पाळण्यासाठी नसतात असाच अनेकांचा ग्रह झाला असावा.

पकडले गेल्यास कारवाई टाळता येऊ शकते असा विश्वास लोकांमध्ये का निर्माण होत असावा? किंवा पकडले गेले तर परिस्थिती ‘मॅनेज’ करता येऊ शकेल असे लोकांना ठामपणे का वाटत असावे? हा भ्रम कोणामुळे जोपासला जात असावा? त्याची जबाबदारी कोणाची? कडक कारवाई याला कदाचित आळा घालू शकेल.

तथापि तशी ती होत असल्याचे अनुभवास अभावानेच येत असावे का? याचा विचार यंत्रणा आणि ती राबवणारे गांभीर्याने करतील का? चुकीमुळे किंवा अनाठायी धाडसामुळे जीव पणाला लागतो हे माहीत असूनही माणसेही शहाणे का होत नसावीत? कायदे आहेत, नियम आहेत पण बदल मात्र घडताना आढळत नाही. माणसांनी त्यांची बुद्धी गहाण ठेवायचीच ठरवली तर त्याला कोण काय करू शकेल? जीवाचे मोल अनमोल असते असे म्हणतात. त्याचे भान माणसे ठेवतील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या