Thursday, November 14, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १२ सप्टेंबर २०२४ - हवेच्या प्रदूषणाचे करायचे काय? 

संपादकीय : १२ सप्टेंबर २०२४ – हवेच्या प्रदूषणाचे करायचे काय? 

नाशिकच्या आल्हाददायक हवेला सातत्याने प्रदूषणाचे गालबोट लागत आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिक देशाच्या तुलनेत तेविसाव्या स्थानावर फेकले गेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा क्रमांक दोनने घसरला आहे. थंड हवेचे शहर अशी नाशिकची देशात ओळख मानली जाते. नाशिककर त्याचा रास्त अभिमान देखील मिरवतात. पण तोच लौकिक हळूहळू कोलमडेल का अशी भीती आता त्यांना वाटू लागली असावी.

वायू प्रदूषण रोखण्याची गरज सातत्याने व्यक्त होताना आढळते. त्यावरच्या उपाययोजना त्यात्या वेळी माध्यमात प्रसिद्ध देखील होतात. पण त्यांचे पुढे काय होते हे लोकांना कधीच समजत का नसावे? उदाहरणार्थ, देशातील अन्य तीन शहरांसह नाशिकमध्ये वायू प्रदूषण शोषून घेणारी यंत्रणा राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेतर्फे उभारली जाणार होती. तसे माध्यमात प्रसिद्धही झाले होते. या संस्थेसह अन्य काही संस्थांनी नाशिकमधील प्रदूषणास कारणीभूत घटकांचा परामर्श एका अहवालात घेतला होता. त्या घटकांची यादीही प्रसिद्ध झाली होती. पण त्या पातळीवर पुढे काहीच घडले नसण्याची शक्यता दाट असू शकेल. अन्यथा नाशिकची सर्वेक्षणात घसरण झाली नसती.

- Advertisement -

हवा प्रदूषणामुळे माणसांना अनेक गंभीर व्याधी जडू शकतात हे आता नव्याने सांगायला नको. म्हणूनच कदाचित वायू प्रदूषण कमी करण्यात लोकसहभाग तज्ज्ञ अपरिहार्य मानत असावेत. रस्त्यांवरून धावणारी वाहने हे वायू प्रदूषणाचे एक महत्वाचे कारण आहे. समाजाने स्वीकारलेली सध्याची जीवनशैली त्याला पूरक ठरत असावी का? रस्त्यांवरून धावणार्‍या वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. सामाजिक प्रतिष्ठा त्याला जोडली गेल्याचे आढळते. त्यामुळे अनेक घरांमध्ये जेवढी माणसे तेवढी वाहने आढळतात. किमान दोन दोनचाकी आणि चारचाकी असणे सामान्य बाब मानली जाते.

काहींसाठी वाहन असणे गरजही असते. सामान्य माणसांचीही कर्ज काढून वाहने घेण्याकडे कल वाढतो. प्रदूषणावरचा वाहनांचा हा भार आणि वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे गरजेचे आहे. ती सर्वत्र ठरलेल्या वेळेत पोचणारी असावी. वाहने दर्जेदार आणि असावीत. त्या व्यवस्थेत प्रवासीपुरक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शिवाय सार्वजनिक वाहतुकीला प्रतिष्ठा (ग्लॅमर) मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत. त्यासाठी त्याचा वापर प्रदूषण कमी करण्याशी जोडला जायला हवा.

युवा पिढीच्या भाषेत सांगायचे झाले तर स्टाईल स्टेटमेंट म्हटले जाऊ शकेल. त्यासाठी अर्थात रस्ते नीट आणि मोकळे हवेत. तसे झाले तर रस्त्यांवरची वाहनांची संख्या घटू शकेल. रस्ते मोकळे होऊ शकतील. पार्किंग समस्येची तीव्रता काहीशी कमी होऊ शकेल. प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर हा एक छोटासा बदल जरी होऊ शकला तरी हवा प्रदूषण कमी होण्यास त्याचा निश्चित हातभार लागू शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या