एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्या आणि एकूणच प्लास्टिक वापराच्या माणसांच्या अनिर्बंध हव्यासापायी प्लास्टिकचा भस्मासूर झाला आहे. नुकताच गोदावरी नदीला पूर येऊन गेला. शहरातील नाल्यांमधून आणि नंदिनी नदीपात्रातूनसुद्धा पुराचे पाणी वाहिले. पात्रांमधून आणि पूर ओसरल्यानंतर काठांनी कोणत्या प्रकारचा कचरा जास्त साचला होता हे लोकांना वेगळे सांगायची गरज आहे का? जो कचरा लोक जास्त प्रमाणात फेकतात तोच कचरा पात्रात साचतो.
तो कचरा एकदा वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकचा असतो. त्यामुळे नाले तुंबतात. परिणामी काठावरच्या वस्त्यांमध्येदेखील पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. देशात शहरे किंवा वास्तूंचा शोध लागतो. अशा ठिकाणी तत्कालीन भांडी, महिलांची आभूषणे, खापरे अशा वस्तू सापडतात. ज्यायोगे त्या ठिकाणचा कालावधी शोधणे सोपे होऊ शकते. भविष्यकाळात एकविसाव्या शतकातील खाणाखुणा सापडतील तेव्हा कदाचित फक्त प्लास्टिकच सापडू शकेल का? जमिनीवर, समुद्रात आणि वातावरणात प्लास्टिकचा भडीमार सुरू आहे.
प्रदूषणचा विषय निघाला की हौशे आणि नवशे शोधच लागायला नव्हता पाहिजे अशी टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करतात. वास्तविक प्लस्टिकच्या शोधामुळे मानवी जीवन अनेकार्थांनी सोपे आणि सुकर झाले. माणसाचे आरोग्य राखणार्या वैद्यकीय क्षेत्रात याचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे अनेक उपकरणांच्या किमती स्वस्त होऊ शकल्या. त्याचा फायदा अंतिमतः रुग्णांनाच होत असावा. सामान्य माणसांना परिचित असू शकेल असे हे उदाहरण आहे. इथे प्रश्न आहे तो माणसांच्या वापराच्या सवयींचा आणि नसलेल्या सामाजिक भानाचा.
प्लास्टिक कचर्याच्या वाढत्या प्रदूषणाला फक्त सामान्य माणसेच जबाबदार आहेत का? नाही. तथापि एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्या, तुटलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे समस्या उग्र होत आहे. लोक वाटेल ते फेकतात. पिशव्या, वस्तू, सॅनिटरी नॅपकिन्स, हगीज, खुर्च्या अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश असतो. ज्या नाहीशा होत नाहीत आणि विरघळतही नाहीत.सरकारने अशा प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यापेक्षा उत्पादनावर बंदी घालावी, असे ही मत अनेकांचे असते. ते उपयोगी असूही शकेल.
तथापि वापराबाबतचा आणि फेकून देण्याबाबतचा दृष्टिकोनच सुधारला तर बंदी प्रभावी ठरू शकेल. त्या पातळीवर सुधारणांचा अभाव असल्यानेच बंदी वारंवार घातली जाते आणि लोक तिचा तितक्याच वेळा फज्जा उडवतात. तसे न होण्यासाठी सवयी बदलावर भर दिला जायला हवाच, पण दृष्टिकोन बदलाचे आव्हानदेखील सामाजिक संस्था आणि सरकारला स्वीकारावे लागेल. बेजबाबदार सवयीमुळे समस्या किती तीव्र होते याची समज वाढणेदेखील गरजेचे आहे. कारण समस्या संपुष्टात आणण्यासाठी तिच्या फांद्या कापून फारसे हाती काही लागत नाही. घाव तर मुळाशी घातले जाण्याची गरज असते.