उद्या व्हॅलेंटाईन दिवस. प्रेमाचा दिवस साजरा करता करता त्याचा सप्ताह कधी झाला हे युवा पिढीच्यासुद्धा लक्षात आले नसावे. प्रेमाचे सात दिवस साजरे करण्याची नवपरंपरा अलीकडच्या काळात रुजली आहे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, कळवळा या भावना माणसाच्या जगण्याचा आधार आहेत. माणसे प्रेमाच्या धाग्यानेच एकमेकांशी घट्ट बांधली जातात. पण त्याचा आविष्कार एका दिवसापुरता किंवा आता एका सप्ताहापुरता मर्यादित ठेवला जाऊ शकेल का? तो फक्त दोन व्यक्तींपुरता मर्यादित ठेवला जाऊ शकेल का?
संत व्हॅलेंटाईनच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक उपरोक्त भावनांचा पुरस्कार करणारी ठरू शकेल. संत व्हॅलेंटाईन ज्या तुरुंगात होता त्याच्या जेलरची मुलगी अंध होती. व्हॅलेंटाईनच्या प्रार्थनेने तिला दृष्टी प्राप्त झाली. त्याला फाशी देण्यापूर्वी त्याने त्याच मुलीला पत्र लिहिले. त्यावर त्याने ‘युअर व्हॅलेंटाईन’अशी स्वाक्षरी केली होती. अशी आख्यायिकादेखील प्रसिद्ध आहे. प्रेमाची व्यापकता संतांनी अनेक अभंगांमधून स्पष्ट केली आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांनी तर ‘प्रेम कुणीही कुणावरही करावे’ असे सांगून भावभावनांचा परिघ व्यापक केला आहे.
प्रेम माणसांवर करा, कलेवर करा, प्राण्यांवर करा असे अनेक मार्ग ते कवितेत सुचवतात. तेही आचरणात आणले जायला हवेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्रेम आणि जिव्हाळ्याची किंवा मैत्रीची जगण्यासाठी किती आवश्यकता असावी? एकटेपण ताण निर्माण करणारे ठरते. प्रेम हृदयातून फुलते असे म्हणतात. त्याच हृदयाला त्याच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी माणसा-माणसांत प्रेम असणे, निसर्गाशी आणि जगाशी जोडले जाणे, नात्यांचे बंध घट्ट होत जाणे आत्यंतिक आवश्यक असते. हे स्पष्ट करणारे अनेक निष्कर्ष माध्यमांत वेळोवेळी प्रसिद्ध होतात.
या भावनांमुळे निर्माण होणारे नातेसंबंध त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असे एरीक फ्रॉम हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो. त्याची भूक प्रत्येकाला असते. इतकी की माणसांच्या सहवासासाठी जपानमधील एकटे वृद्ध लोक गुन्हा करून तुरुंगात जायला तयार होतात, असे सांगितले जाते. प्रेमाची भावना दृगोच्चर करणारा दिवस म्हणूनच साजरा केला जात असावा. तथापि त्याचा परिघ विस्तारला गेला तर ते अनेकांच्या सुखाचे निधान ठरेल.
कारण कुटुंब, सामाजिक वर्तुळ, मित्र, आप्तेष्ट अशांप्रती जिव्हाळा व्यक्त करणारी ती एक खोल भावना आहे. तसे झाले तर भरल्या घरात माणसे एकटी पडणार नाहीत. प्रेमाचे रूपांतर द्वेषात होणार नाही. माणसे एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत. तात्पर्य, कुसुमाग्रज म्हणतात, प्रेम आहे माणसाच्या संस्कतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा, एकमेव..! हेच खरे.