Tuesday, September 17, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १३ जुलै २०२४ - भूतां परस्परे जडो..

संपादकीय : १३ जुलै २०२४ – भूतां परस्परे जडो..

मानाच्या पालख्या आणि हजारो दिंड्या पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. जसजशी आषाढी एकादशी जवळ येईन आणि पंढरपूर निकट येईन तसतसे ‘आता कोठे धावे मन..’ अशी वारकर्‍यांची मनोवस्था होईल. सुमारे आठशे वर्षे वारीची परंपरा अखंड सुरू आहे. कारण विठ्ठल त्याच्या भक्तांच्या भावना जाणतो. तोच कर्ता आणि करविता आहे यावर वारकर्‍यांची अगाध श्रद्धा असते. त्यामुळेच कदाचित ‘होय होय वारकरी..पाहे पाहे रे पंढरी’ या भावनेने सावळ्या विठ्ठलाला डोळे भरून पाहण्यासाठी वारकरी मैलोन्मैल चालतात. दर्शन घेतात आणि घरी परततात.

- Advertisement -

वारीच्या मार्गावर वारकर्‍यांची सेवा करण्याची जणू माणसांमध्ये अहमहमिकाच लागते. लोक त्यांचे पाय चेपतात. मसाज करतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात. वारकरी जेव्हा त्यांची सेवा स्वीकारतात तेव्हा कोण आनंद या लोकांना होत असावा. जणू त्यांच्या रूपाने विठ्ठलाला नमस्कार पोहोचावा, असेच त्यांना वाटत असावे. वारीवर प्रचंड अभ्यास झाला. होत आहे. प्रबंध लिहिले गेले आहेत. ‘विष्णुमय जग..वैष्णवांचा धर्म..भेदाभेद भ्रम अमंगल..कोणा ही जीवाचा न घडो मत्सर’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात.

संतांचे मुकुटमणी संत ज्ञानेश्वरांनी तर ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ हेच मागणे मागितले आहे. शोध घेतला तर संतांचे नाव फक्त बदलते पण त्यांनी केलेल्या उपदेशांचे मर्म मात्र एकच सापडते. स्वार्थ सोडून द्यावा. कोणाचाही मत्सर करू नये. सर्वांना सारखे मानावे हेच सगळे सांगतात. एवढेच कशाला, अंधश्रद्धा, भेदाभेद, कालबाह्य रुढी यांच्यावर सर्वांनीच कठोर भाषेत प्रहार केले आहेत. लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. वारीत भेदभाव नसतो. सगळे एकसमान असतात. दिंडीत महिला-पुरुष-मुलेबाळे-आजोबा-आजी सगळेच तन-मन-धन अर्पून चालतात. कोणी कोणाचे नाव विचारत नाही की गाव पुसत नाही. वारी संपेपर्यंत ‘माऊली’ हीच सर्वांची ओळख. ‘एक एका लागतील पायी रे’ हाच अनुभव वारीदरम्यान सर्वांना येतो. तसाच तो दैनंदिन जीवनातदेखील यायला हवा, असे जाणते म्हणतात.

वास्तवात समाजात भेदाभेद आढळतात. माणसांची जातीपातीत वाटणी झाल्याचे आढळते. द्वेष, वैरभावना आणि अहंकारापोटी माणसे ऐकमकांच्या जीवावर उठल्याच्या घटना अधूनमधून घडतात. सामाजिक वातावरण कलुषित होत चालल्याचे जाणत्यांचे निरीक्षण आहे. तसे घडू नये हीच तर संतांची शिकवण आहे. त्यांनी मानवतेचा पुरस्कार केला आहे. वारी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतांची शिकवण कायमची अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मनात निरंतर वारी करणेच ठरू शकेल का? तसे झाले तर सध्याची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी वेगळे प्रयत्न कदाचित करावेच लागणार नाहीत. कारण संतांची शिकवण कालातीत असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या