राज्यातील गरजू युवती आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने गुलाबी रिक्षा वाटप योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यात नुकतेच या रिक्षांचे चाक काही महिलांच्या हाती सोपवण्यात आले. महिलांना रोजगार मिळावा आणि रात्री-अपरात्री घरी परतणार्या महिलांना सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
या योजनेचे महिलांना अनेक फायदे संभवतात. बहुसंख्य महिला दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवतात. तथापि ती संधी सर्वच महिलांना मिळत असू शकेल असे नाही. ती उणीव कदाचित दूर होऊ शकेल. वाहन चालवणे हे विशिष्ट कौशल्य आहे. या कौशल्याचे रूपांतरण उदरनिर्वाहात होण्याची संधी ही योजना मिळवून देऊ शकेल. महिला बस-ट्र्क चालवतात हे खरे तथापि, अशी वाहने किंवा रिक्षा चालवणे हे महिलांचे काम नाही हा समज मोठ्या प्रमाणात आढळतो. तोही काही प्रमाणात निकाली निघू शकेल.
रिक्षा हे प्रवासी वाहन आहे. सर्वदूर वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले आढळतात. लोक नियम पाळत नाहीत. आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगत नाहीत. सर्वांना एकमेकांच्या वाहनांना ओलांडून पुढे जायचे असते. वाहतूक जाम असेल तर अनेक चालक संयम गमावतात. अस्वस्थ होतात. जोरजोरात हॉर्न वाजवतात. पोलिसांनी कारवाई करायचा प्रयत्न केला तर हुज्जत घालताना आढळतात. अशा वाहनचालकांमध्ये महिला अजूनही मोठ्या संख्येने आढळत नाहीत. बहुसंख्य महिला वाहन शांतपणे, संयमाने चालवताना आढळतात.
वाहतूक जाममध्ये अभावानेच घाई करताना आढळतात. महिला त्यांना नेमून दिलेले काम गंभीरपणे करतात. हीच स्वभाव वैशिष्ट्ये त्यांना चांगल्या वाहनचालक बनवू शकतील का? गुलाबी रिक्षा नोकरदार महिलांना सुरक्षित प्रवासाची संधी देतील असे एक उद्दिष्ट आहे. महिला महिलांना जवळच्या वाटतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी गुलाबी रिक्षातून प्रवास करणे नोकरदार महिलांना सुरक्षित वाटू शकेल. तथापि त्यासाठी किमान रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत रस्त्यांवरून गुलाबी रिक्षा धावणे आवश्यक आहे.
महिलांच्या दृष्टीने सध्याचे सामाजिक वातावरण असुरक्षित मानले जाते. तेव्हा रात्री किती उशिरापर्यंत महिला चालक त्यांची गुलाबी रिक्षा चालवतील हा प्रश्नच आहे. पण निदान रात्री काहीकाळ तरी महिलांना त्यांचा आधार वाटू शकेल, हेही नसे थोडके. महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी ही योजना त्यांना मिळवून देणार आहे. जसजशा गुलाबी रिक्षा रस्त्यांवरून धावू लागतील तसतसे या योजनेचे फायदे आणि त्यातील उणिवा लक्षात येतील असे गृहीत धरायला काय हरकत आहे?