दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण! मात्र, याच उत्सवाला फटायांच्या बेसुमार आतषबाजीचे गालबोट लागल्याने आनंदाच्या वातावरणावर विषारी धुराचे सावट निर्माण झाले आहे. यंदाच्या दिवाळीनंतर नाशिक शहरात प्रदूषणाने गाठलेली धोकादायक पातळी ही केवळ चिंतेची बाब नाही, तर शहराच्या पर्यावरण व्यवस्थेसमोर उभे राहिलेले गंभीर आव्हान आहे. नाशिकमध्ये दिवाळीच्या काळात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक -एक्यूआय- झपाट्याने वाढल्याचे स्थानिक निरीक्षणांतून समोर आले. काही निरीक्षण केंद्रांवर ९६४, तर समतानगर परिसरात १००० च्या आसपास प्रदूषणाची नोंद झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.
गेल्या वर्षी नाशिकचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३९४ च्या आसपास नोंदवला गेला होता. यंदा त्यात झालेली वाढ शहराच्या पर्यावरणीय आरोग्यासाठी धोयाची घंटा आहे. समतानगरसारख्या निवासी भागात फटायांच्या आतषबाजीनंतर प्रदूषणाची पातळी वाढणे म्हणजे नागरिकांच्या घरापर्यंत प्रदूषणाचे संकट पोहोचल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. नाशिकपुरतीच ही परिस्थिती मर्यादित नाही. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये दिवाळीनंतर हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा संपल्यानंतर वातावरणातील बदल, वार्याचा मंदावलेला वेग, वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे प्रदूषकांचे प्रमाण आधीच वाढलेले असते. त्यात फटायांच्या धुराची भर पडल्याने परिस्थिती अधिकच बिकट होते.
नाशिकसारख्या वाढत्या औद्योगिक आणि नागरी विस्ताराच्या शहरात या घटकांचा एकत्रित परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवतो. सातपूर, अंबडसारख्या औद्योगिक परिसरातील उत्सर्जन, वाढती वाहनसंख्या आणि अनियंत्रित बांधकामे यावरही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. फटायांच्या धुरातून बाहेर पडणारे सूक्ष्म धूलिकण (पीएम २.५ आणि पीएम १०), सल्फर डायऑसाइड, नायट्रोजन ऑसाइड आणि विषारी रासायनिक घटक श्वसनसंस्थेला गंभीर हानी पोहोचवतात. अतिसूक्ष्म कण फुफ्फुसांच्या खोल भागात जाऊन रक्तप्रवाहातही प्रवेश करू शकतात. परिणामी खोकला, घशात खवखव, डोळ्यांची जळजळ, दम लागणे आणि श्वसनाचे विकार वाढतात. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यास हृदयविकार, पक्षाघात आणि फुफ्फुसांच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दमा किंवा हृदयविकाराचे रुग्ण यांना याचा सर्वाधिक फटका बसतो.
जागतिक आरोग्य संघटनेनेही वायुप्रदूषणाला सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर संकट मानले आहे. २०१९ मध्ये भारतात वायुप्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे सुमारे १६.७ लाख मृत्यू झाल्याचा अभ्यासातील निष्कर्ष या संकटाची भीषणता अधोरेखित करतो. प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयांनी फटायांच्या प्रकारांवर आणि वेळांवर निर्बंध घातले आहेत. मात्र, नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने त्यांचा अपेक्षित परिणाम दिसत नाही. रात्री उशिरापर्यंत फटाके फोडणे, रहिवासी वस्त्यांमध्ये मोठ्या आवाजाचे फटाके उडवणे आणि सार्वजनिक ठिकाणी आतषबाजी करणे सर्रास सुरू असते. नाशिकमध्ये प्रदूषणाची पातळी इतकी वाढत असताना महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस प्रशासनाने केवळ आकडेवारी प्रसिद्ध करून थांबता कामा नये. प्रदूषणाचे स्रोत शोधून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
हवेच्या गुणवत्तेचे नियमित मोजमाप, संवेदनशील भागातील निरीक्षण आणि नागरिकांना वेळेवर सूचना देण्याची यंत्रणा सक्षम करावी लागेल. नागरिकांनीही फटायांचा अनावश्यक वापर टाळून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नाशिकची ओळख धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्गसंपन्न शहर अशी आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या या शहराचा श्वासच प्रदूषणाने कोंडला जाणे ही विकासाच्या संकल्पनेला काळिमा फासणारी बाब आहे. शहराचा विकास हवा; मात्र तो नागरिकांच्या आरोग्याची किंमत मोजून नको.
दिवाळीचा खरा आनंद दिव्यांच्या प्रकाशात आहे, विषारी धुराच्या अंधारात नाही. फटायांचा आवाज काही क्षणात विरतो; पण त्यातून निर्माण झालेले प्रदूषण अनेक दिवस आणि त्याचे दुष्परिणाम अनेक वर्षे टिकतात. नाशिकमधील प्रदूषणाची ही धोयाची घंटा वेळीच ऐकली नाही, तर आगामी काळात शहराला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणूनच आता तरी उत्सवाच्या नावाखाली निसर्ग आणि मानवी आरोग्याची होणारी घुसमट थांबविण्याची वेळ आली आहे.




