खरोखरच काहीतरी विचार करावा, असे अनेक मुद्दे समाज माध्यमांवर फिरतात. एका सेकंदाची किंमत त्याला विचारा ज्याचा अपघात एका सेकंदाने टळतो. एका मिनिटाची किंमत त्याला विचारा ज्याची एका मिनिटाने रेल्वेगाडी चुकते, अशा आशयाचा मजकूर अधून-मधून फिरतो. त्यालाच पुढे जोडून, एका संधीची किंमत त्याला विचारा; ज्याच्याकडे तिचा पूर्ण अभाव असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
असेच यश ‘सुपर फिफ्टी’ उपक्रमातील सात विद्यार्थ्यांनी मिळवले आहे. हा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी चालवला आहे. ‘नाही रे’ वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्याक्रमांबरोबरच मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. यंदा या उपक्रमातील सात विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत साधारण आहे. काही जणांचे पालक मोलमजुरी करतात. विपरिततेचा कोणताही बाऊ न करता त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यासाठी अपार कष्ट उपसले. कारण संधी एकदाच मिळते ही गोष्ट ते जाणून असावेत. ही विजिगिषुवृत्ती त्यांच्यात अभावग्रस्ततेने पेरली असावी.
नुकताच समारोप झालेल्या ‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्ये सहभागी झालेले अनेक खेळाडू त्याच जातकुळीतील होते. त्यांच्या यशोगाथा माध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. बीडचा अविनाश साबळे वीटभट्टी कामगाराचा मुलगा! अनवाणी धावण्यापासून ऑलिम्पिकच्या ट्रॅकवर धावण्याचा त्याचा प्रवास कोणत्याही पदकाइतकाच प्रेरणादायी आहे. अन्य अनेक खेळाडूंचा प्रवास असाच संघर्षमय आहे. निराशेचे, प्रवाहपतित होण्याचे, दिशाहीन होण्याचे, आयुष्य उद्ध्वस्त करणारे अनुभव घेतल्याचे अनेकांनी मोकळेपणाने मान्य केले, पण त्यांनी त्यावर मात करून फिनिक्स पक्ष्यासारखी झेप घेतली हे त्यापेक्षा जास्त लक्षवेधी आहे. इतरांसाठी प्रेरणादायी आहे. युवकांना अनेक समस्या भेडसावतात.
महाग होत चाललेले शिक्षण, परीक्षा घोटाळे, पेपरफुटी, त्या गोंधळात वाढत चाललेले वय आणि वाढती बेरोजगारी या त्यापैकीच काही समस्या होत. व्यक्तिगणिक समस्यांचे आणि आव्हानांचे स्वरूप वेगळे असते हे खरे! तथापि लक्ष्य निश्चित असेल तर आव्हानांचा सामना करता येणे शक्य होते हेच वरील उदाहरणे स्पष्ट करतात. बाऊ न करता प्रयत्नात सातत्य राखले आणि निर्धार केला तर वाटचाल सोपी होऊ शकते. या सर्व खेळाडूंकडे ‘गिव्ह अप’ करण्याची सबळ कारणे होती, पण त्यांनी ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल’ यातील मर्म समजावून घेतले असावे. ते मर्म सर्वांनीच जाणून आत्मसात करण्याची गरज आहे.