Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १४ मार्च २०२५ - उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा

संपादकीय : १४ मार्च २०२५ – उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा

मार्च महिन्यातच तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. नाशिकसारख्या अनेक शहरांचा थंड हवेचा लौकिक त्याने पार निकालात काढायचे ठरवले असावे. गेल्या आठवड्यात एक दिवस नाशिकचा तापमानाचा पारा अडतीस अंश सेल्सियस इतका नोंदवला गेला. अन्य शहरांचीही परिस्थिती फारशी वेगळी नसेल. राजस्थानमध्ये हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर दुसर्‍या बाजूला हिमाचल आणि पंजाबमध्ये पावसाचा इशारा आहे.

त्या त्या प्रदेशांची हवामान वैशिष्ट्ये असली तरी हवामान किती लहरी झाले आहे याची ही प्रातिनिधिक उदाहरणे म्हटली जाऊ शकतील. राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. राज्याच्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने विशेष आपत्कालीन कक्ष उभारण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालिकांनी माध्यमांना सांगितले. त्यासाठी साथरोग वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रशिक्षणदेखील देण्यात आल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. याचा फायदा करून घेणे आणि त्या व्यवस्थेत काही कमतरता जाणवल्यास संबंधितांच्या नजरेला आणून देणे ही लोकांचीदेखील जबाबदारी आहे. कारण उष्माघात प्रसंगी जीवावरदेखील बेतू शकतो, हे लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

शासन सज्जता ही झाली एक बाजू. तथापि उष्माघात किंवा उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी लोकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पार्‍याने चाळिशी जरी ओलांडली तरी उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडणे बहुसंख्यांना अपरिहार्य असते. घराबाहेर पडताना त्यांनी कोणती काळजी घ्यावी हे शासनाने तर जाहीर केले आहेच पण तज्ज्ञदेखील माध्यमांतून वारंवार सांगत आहेत. अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी माणसाने अमलात आणल्या तर उष्णता प्रकोपाचा परिणाम किमान तरी टाळणे शक्य होऊ शकेल. जसे की, गडद रंगाचे कपडे न घालणे, पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे, जास्त घाम येत असेल तर साखर-मीठ-पाणी किंवा ताक पिणे इत्यादी.

याचबरोबर लोकांनी सामाजिक भानदेखील दाखवणे गरजेचे आहे. पाणी जपून वापरावे. उन्हाचा तडाखा माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही बसतो. त्यांच्यासाठी पाणी ठेवता येऊ शकेल. छोटी छोटी पसरट भांडी भरून ठेवली तर पक्षी पाणी तर पितातच पण उन्हाची काहिली कमी करण्यासाठी त्यात आंघोळदेखील करतात. ते पाहणे या वातावरणात आल्हाददायकच अनुभव ठरू शकेल. शेवटी काय, उष्णतेच्या प्रकोपाच्या या काळात सर्वांसाठी उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...