अवकाळी पाऊस नाशिकला चांगलेच झोडपून काढत आहे. काही काळ तीव्र ऊन आणि काही काळ अक्षरशः कोसळधार गडगडाटी पाऊस असे दोन ऋतू लोकं एकाच वेळी अनुभवत आहेत. पावसाच्या मार्याने गटारी तुंबल्या आहेत. लाईटचे खांब कोसळले आहेत. विजेचा लपंडाव सुरूच आहे. शहरात जागोजागी पाण्याचे तलाव तयार झाले आहेत. अनेक घरांमध्ये सांडपाणी मिश्रित पावसाचे पाणी शिरले आहे. काही ठिकाणी विजा कोसळल्या. गेल्या चार-पाच दिवसात सुमारे पन्नास झाडे कोसळली. शेतकर्यांचे अपरिमित नुकसान झाले. दीड दोन तासाच्या पावसाने शहराची अशी अवस्था होणार असेल तर पावसाळ्यात काय घडेल याची कल्पनाच न केलेली बरी.
नागरिकांनी पावसाळ्यात वर्षानुवर्षे तुंबलेल्या शहरातच राहावे, असे प्रशासनाला वाटत असावे. त्यामुळेच कदाचित वर्षानुवर्षे पावसाळापूर्व कामे होतच आहेत आणि पावसाळ्यात शहरे पाऊस आणि गटारीच्या पाण्यात जातच आहेत. मग पावसाळापूर्व कामे नेमकी कोणती केली जातात? कुठे केली जातात? त्या कामांची तपासणी केली जाते का? की फक्त कंत्राट दिले की प्रशासनाची जबाबदारी संपली असा प्रशासनाचा ग्रह झाला असावा? अन्यथा, वर्षानुवर्षे तेच ते आणि तेच ते कसे घडते? उदाहरणार्थ दर पावसाळयात मोठ्या संख्येने झाडे कोसळतात. आताही ती कोसळली आहेत. ती का, याचा अभ्यास केला जातो का? तज्ज्ञ त्याची काही प्रमुख कारणे सांगतात. पावसाळापूर्व काम म्हणून विजेच्या तारांना अडथळा निर्माण करणार्या फांद्या तोडल्या जातात. पण त्या तोडताना शास्त्रीय पद्धत अवलंबली जातांना फारसे आढळत नाही.
खांब आणि तारा मोकळ्या करण्याला प्राधान्य दिले जाते. पण तसे करतांना एकाच बाजूच्या फांद्या तोडल्या जातात. मग ते झाड असंतुलित होते. एका बाजूला झुकते. वादळाचा मारा सहन न झाल्याने अशी झाडे उन्मळून पडतात. ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉकचे किंवा रस्ता काँक्रिटीकरणाचे काम गाजावाजा करत केले जाते. ते काम करतांना वृक्षांच्या खोडाभोवती गच्च काँक्रिटीकरणाचा थर दिलेला आढळतो. ज्यामुळे खोडाची साल खराब होते. खोडाशी पाणी मुरुन ते कुजते. कालांतराने ते झाड भार सहन करू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी रस्त्यांच्या दुतर्फ़ा खोदकाम सुरूच असते. त्यामुळेही झाडांची मुळे कमकुवत होतात. अशा झाडांना पावसाळ्यातील वार्याचा वादळी वेग सहन होत नाही.
पावसाळापूर्व कामांच्या पद्धतीचे आणि गुणवत्तेचे हे एक वानगीदाखलचे उदाहरण आहे. रस्त्यांचेही तेच. रस्ते उंचसखल बनतातच कसे? अशा रस्त्यांमध्ये पाणी साठणार हे लक्षात खरेच येतच नसावे का? सरकारी कामे गुणवत्तापूर्ण होणार नाहीत याचा जनतेला ठाम विश्वास का वाटतो याचा विचार सरकार कधी करेल? पावसाळ्यात या सगळ्यांचा मिळून परिणाम व्यवसाय आणि सामाजिक आरोग्यावर होतो. साथ रोगांच्या फैलावाला पूरक परिस्थिती निर्माण होते. शिवाय दर्जाहीन किंवा शास्त्रीय दृष्टिकोनहीन कामे नागरिकांनी भरलेल्या कराचे पैसेही पाण्यात घालवतात ते वेगळेच. लोकांनी हे असेच किती पावसाळे सहन करायचे हा खरा प्रश्न आहे.