Thursday, November 21, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १४ नोव्हेंबर २०२४ - जलदगती न्यायाइतकेच हेही महत्त्वाचे

संपादकीय : १४ नोव्हेंबर २०२४ – जलदगती न्यायाइतकेच हेही महत्त्वाचे

बलात्कार पीडितांना जलदगतीने न मिळणारा न्याय हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. मुळात त्या दुर्दैवी घटनेने पीडिता आणि तिच्या कुटुंबियांचे मनोधैर्य खच्ची झालेले असते. त्यात न्यायाला होणारा विलंब त्यांच्यासाठी निराशा वाढवणाराच ठरतो.

बलात्कार पीडितांचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये कोणताही अनावश्यक विलंब केवळ त्यांचा त्रास वाढवतो आणि वेळेवर न्याय मिळण्यात अडथळा निर्माण करतो अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयानेदेखील एका प्रकरणात केली होती. त्याच आशयाच्या भावना एका पीडितेने न्यायसंस्थेसमोर व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. ती वाराणसी आयआयटीची विद्यार्थिनी आहे.

- Advertisement -

तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. हे प्रकरण देशभर गाजले. त्याची सुनावणी वाराणसी जलदगती न्यायालयात सुरू आहे. न्यायाची प्रतीक्षा वाढतच चालली आहे. यामुळे माझी निराशा वाढत आहे अशा भावना तिने व्यक्त केल्याचे वृत्तात म्हटले आहे. अजमेरमधील एका पीडितेला तर न्यायाची तब्बल 32 वर्षे वाट पाहावी लागली होती. तिच्या वेदना माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. वास्तविक पीडिता आणि तिचे कुटुंबीय प्रचंड मानसिक ताणात असतात. त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते.

न्याय जलदगतीने मिळावा अशी त्यांची अपेक्षा रास्तच. तसे घडणे तिच्यावरील अन्यायाचे थोडेतरी परिमार्जन करणारे ठरू शकेल. अशा घटनांमध्ये दोषींना कडक शिक्षा व्हावी म्हणजे तसा गुन्हा करण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही अशाच भावना सामान्य माणसेही व्यक्त करतात. तथापि तसे अभावानेच घडते हे वाराणसी प्रकरणाने अधोरेखित केले आहे. विलंबाने मिळणार्‍या न्यायाला न्याय म्हटले जाऊ शकेल का? त्याबरोबरीने समाजात अशा घटना वेगाने का वाढत आहेत याचाही विचार करणे गरजेचे आहे. मानसिक विकृती वाढत आहे.

अजाण वयाच्या बालिकेपासून वयोवृद्ध महिला त्याच्या बळी ठरतात. ही मानसिकता कशी बदलते? का बदलते? मूल्यांची घसरण हे त्याचे एक प्रमुख कारण मानले जाते. सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांची वीण विसविशीत होते आहे. ती घट्ट करणारा परस्पर संवाद हरपला आहे. तो कसा सुस्थापित करता येईल, मूल्यसंस्कार कसे केले जाऊ शकतील यावर विचारमंथन होणे अत्यंत गरजेचे आहे. किती युवांना त्यांच्या भावनांचे नियमन करता येते? किंवा ते कसे करायचे याचे ज्ञान असते? बहुसंख्यांना ते जमत नाही कारण तसे ते शिकवलेच जात नाही.

सरधोपटपणेच त्याकडे पाहिले जाते किंवा तसे मुलांना शिकवायचे असते हेच बहुसंख्य पालकांना माहीत नसते. परिणामी भावभावना वेडेवाकडे वळण घेण्याचा धोका बळावू शकतो. समाज माध्यमांची काळी बाजू त्यात भरच घालणारी ठरते. सामाजिक विकासात आणि कौटुंबिक बांधिलकीसाठी युवांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास मैलाचा दगड ठरतो. तो त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो. तो कसा साध्य होऊ शकेल यावरही काम होणे काळाची गरज आहे. जलदगती न्यायाइतकेच तेही महत्त्वाचे आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या