जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा परिषदेने घेतला आहे. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे आणि पावसाळ्यातील संभाव्य साथीच्या आजारांना प्रतिबंध व्हावा, असा या सर्वेक्षणामागचा उद्देश आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण महत्वाचे आहे. कारण दूषित पाणीपुरवठा अनेक आजारांचे कारण आहे. कॉलरा, डायरिया, उलट्या, ताप किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. ज्यांना जलजन्य आजार मानले जाते.
पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. सर्वेक्षणाअंती त्याला आळा घातला जाऊ शकेल. अशा सर्वेक्षणाचे अनेक फायदे सांगितले जाऊ शकतील. यानिमित्ताने जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्रोतांचे दस्तऐवजीकरण (डॉक्यूमेंटेशन) होऊ शकेल. जिल्ह्यातील गावागावात असे स्रोत आढळतात. त्या सर्वांची शासनदरबारी नोंद असेलच असे नाही. ती उणीव यातून दूर केली जाऊ शकेल. अनेक गावे-वाडे आणि पाड्यांवर हंगामी पावसाच्या काळात धो धो पाऊस आणि डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईची चाहूल अशी स्थिती वर्षानुवर्षे आढळते. स्रोत ज्ञात असले तर किती जलस्रोतांचे पुनर्भरण करणे शक्य आहे याचा अंदाज प्रशासन घेऊ शकेल. त्याचा आराखडा बनवला जाऊ शकेल. यानिमित्ताने सार्वजनिक जलस्रोतांना धरून जनतेच्या समस्या समजावून घेतल्या जाऊ शकतील.
‘देशदूत’ वार्ताहरांचा चमू वेळोवेळी ग्रामीण भागात फिरून ‘ग्राऊंड रिपोर्ट’ तयार करत असतो. त्या त्यावेळी अशा समस्या लक्षात येतात. उदाहरणार्थ, गावच्या विहिरीवरून नळपाणी पुरवठा योजना घेतलेली असते पण कुठे विजेची मोटर नसते तर कुठे नळांना तोट्या नसतात. परिणामी विहिरीवरच्या चकरा सुरूच आढळतात. अशा समस्या प्रशासनाच्या लक्षात येऊ शकतील. पाऊस अत्यंत लहरी होत चालला आहे. कमी दिवसात जास्त पाऊस पडून जाण्याचा नवाच पायंडा पडत आहे. यंदा ‘ला निनो’ चा प्रवाह समाप्त झाल्याची घोषणा अमेरिकेच्या संस्थांनी माध्यमांमध्ये नुकतीच केली.
भारतीय हंगामी पावसासाठी आशादायक ही स्थिती ठरू शकेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. तथापि ‘निनो’ कोणताही असो पावसाच्या प्रमाणाविषयी लोक साशंकच असतात. पूर किंवा दुष्काळ पडू शकतो अशी भीती आढळते. दुष्काळी परिस्थितीत जलस्रोतांचे सर्वेक्षण सरकारी उपाययोजनांना साहाय्यभूत ठरू शकेल. तीव्र दुष्काळाच्या काळात असे नैसर्गिक जलस्रोत ताब्यात घेण्याचा विचार सरकार करू शकते. जेणेकरून सर्वाना पाणीपुरवठा वेळेत आणि सारखा व्हावा. सर्वेक्षणामुळे जलस्रोतांचा नेमका आकडा, त्यांचे ठिकाण आणि स्थिती सरकारकडे तयार असेल. हे साठे नियमित स्वच्छ ठेवण्याचा आराखडा आखण्याचा विचार प्रशासनाला करता येऊ शकेल. पण त्यासाठी सर्वेक्षण अत्यंत प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक पार पाडले जाणे अपेक्षित आहे.