Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १५ ऑगस्ट २०२४ - बहिरेपण टाळण्याचे सज्ञान येईल का?

संपादकीय : १५ ऑगस्ट २०२४ – बहिरेपण टाळण्याचे सज्ञान येईल का?

कानात इयरफोन घालून माणसे स्वीकारत असलेले तात्पुरते सामाजिक बहिरेपण त्यांच्या वाट्याला कायमचे येऊ शकेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. हेडफोनच्या अतिवापरामुळे 2050 पर्यंत जगातील सुमारे 100 कोटी युवा कायमचे बहिरे होऊ शकतील, असा धोका संघटनेने व्यक्त केला आहे. 12 ते 35 वयोगटातील सुमारे 50 कोटी लोक कानांच्या बहिरेपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.

कानात सतत घातलेले इयरफोन, असह्य आवाजाच्या सान्निध्यात काही काळ राहणे ही त्याची काही प्रमुख कारणे आहेत. हाच धोक्याचा इशारा गेली अनेक वर्षे देशातील तज्ज्ञ देत आले आहेत. तात्पुरते किंवा कायमचे बहिरेपण येणार्‍या लोकांची, विशेषतः तरुणांची संख्या वाढत चालल्याकडे लक्ष वेधून घेत आहेत. तरीही लोकांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात का येत नसावे? कान कायमचे सुट्टीवर गेले तरी चालतील पण इयरफोनचा नाद सोडणार नाही, असा खाक्या का अनुभवास येत असावा? ‘अति विषयी सर्वदा दैन्यवाणा’ असे रामदास स्वामी म्हणतात.

- Advertisement -

कोणतीही गोष्ट अति करणारा माणूस शेवटी संकटात येतो, असा त्याचा भावार्थ. उपरोक्त मुद्दा हे त्याचे चपखल उदाहरण. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनेक शिखरे गाठली असली तरी कृत्रिम कान तयार करण्यात मात्र यश आलेले नाही. त्यामुळे बहिरे होण्यापासून कान वाचवणे हाच त्यावरचा उपाय आहे. आगामी काळात त्याचाच विसर पडण्याची शक्यता जास्त असावी का? कारण अनेक सार्वजनिक सणांची चाहूल लागली आहे. श्रावण महिना सार्वजनिक सणांची नांदी घेऊनच सुरू होतो. समाज संघटित होऊ शकेल असे अनेक सण आगामी काळात साजरे केले जातील. लोकोत्सव असेही त्या सणांचे वर्णन केले जाऊ शकेल.

सण तर जोरदार साजरे करावेतच पण ते करताना ‘कानांचे’ मात्र थोडेसे भान राखावे हेच बरे ठरेल. त्यासाठी अत्यंत सोपे उपायसुद्धा असतात, जसे की, आवाजाची मर्यादा पाळणे. आता राहिले वैयत्तिक इयरफोन वापरण्याबाबत. तर त्यालासुद्धा आवाजाची मर्यादा असते. आवाज वाढला तर फोनदेखील तशी धोक्याची लाल फुली देतो. ती जाणीवपूर्वक बघणे आणि ती पाळणे ही ज्याची त्याची जबाबदारी. सोपे उपाय अमलात आणणे माणसांच्या निर्धारावर अवलंबून आहे. ज्याचीच सध्या मोठी उणीव जाणवते.

कानातील हे दागिने काढण्याचा अजून एक महत्त्वाचा फायदा दृष्टिआड करून चालणार नाही. कानात इयरफोन घातले की माणसे तात्पुरती बहिरीच होतात. सभोवतालचे भान आणि परिस्थितीची जाण त्यांच्या मनापर्यंत पोहोचतच नाही. आजूबाजूला काय घडते आहे हे त्यांच्या गावीही नसते. परिणामी ते स्वतःच संकटात सापडण्याचा धोकाही ते ओढवून घेतात. हे सगळे टाळण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वनियंत्रण लोक पाळतील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या