७९ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. युद्धखोरीची भाषा न करता, कोणताही अतिरेकी आविर्भाव न आणता रणनीतीच्या, कूटनीतीच्या बळावर हे शय करून दाखवले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सर्वोच्च बलाढ्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एककल्ली निर्णयाला देशाने ठोस प्रत्युत्तर दिले. तंत्रज्ञान, संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षितता, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त केली जात आहे. नुकतेच देशाने स्वतःचे सर्च इंजिन बनवले आणि त्याची घोषणादेखील केली.
भारताच्या या धोरणात्मक स्वायत्ततेच्या पवित्र्यामुळे जग अचंबित आहे तर अविकसनशील देश प्रेरणा घेत आहेत. भारत इतर कोणत्याही देशांवर आता अवलंबून नाही, हे अधोरेखित केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे गारूड तर जगाच्या मनावरून अजूनही उतरलेले नाही. देशवासियांनाही त्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रम पत्रिकेवर ‘ऑपरेशन सिंदूर’चा लोगो टाकण्यात आला हे त्याचेच द्योतक आहे. इस्रो नवनवे ऐतिहासिक टप्पे गाठत आहे. जगातील सर्वात महागडा उपग्रह इस्रोने नुकताच यशस्वीपणे प्रक्षेपित केला. अमेरिकेचा विशाल कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. चांद्रयान-३, गगनयान मोहिमेची तयारी सुरू आहे. मानवी अंतराळ मोहीम आणि अवकाश संशोधनदेखील टप्प्यात आले आहे. डिजिटल इंडियामुळे सर्वच स्तरांवर बदल झाले. म्हणजे सेवा कार्यक्षम झाल्या. सरकारी व्यवहार पारदर्शी झाले. विशेष म्हणजे सामान्य माणसे डिजिटल जगाशी जोडली गेली.
लोक आत्मविश्वासाने ऑनलाईन व्यवहार करू लागले. यूपीआय हे लोकांच्या दैनंदिन ऑनलाईन व्यवहारांचे साधन बनले. देश अनेकार्थांनी प्रगतिपथावर असला तरी अनेक आव्हाने आजही कायम आहेत. वास्तविक ‘वसुधैव कुटुंबकम’ची देणगी जगाला भारताने दिली. हे विश्वचि माझे घर याची महती जगाला सांगताना देशातील वास्तव मात्र काहीसे भिन्न आढळते. जातीपातीची, अंधश्रद्धांची, भेदाभेदांची पाळेमुळे उखडून टाकण्यात संपूर्ण यश आलेले नाही. यामुळे समाज कधीतरी विघटनाच्या उंबरठ्यावर उभा राहील का, अशी भीती जाणत्यांना साधार वाटते. भाषा व संस्कृतीच्या मुद्यावर संकुचित विचारसरणी अनुभवास येते. यामुळे माणसांची मने दुभंगण्याची भीती आहे. देश तेव्हाच सशक्त बनू शकेल जेव्हा देशाने आणि नागरिकांनी पाहिलेले स्वप्न एकच असते. नव्या पिढीला या स्वप्नांशी जोडून घेण्याचे आव्हान मोठे आहे. कारण याच पिढीच्या बळावर देश महासत्ता आणि विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहतो आहे.
जुन्या पिढीसारखी ही पिढी भारून जाणारी नाही. बहुसंख्य युवा तर्कसंगत विचार करतात. त्यांना प्रश्न पडतात. ते विचारण्याचे धाडस त्यांच्याकडे आहे. देशात घडणार्या घडामोडींबद्दल ते जागरुक आहेत. सजगपणे मते व्यक्त करण्याचा समंजसपणा आढळतो. त्यामुळे राष्ट्रीयत्व, देशाभिमान त्यांच्यात रुजवण्यासाठी त्यांच्याशी तर्कसंगत संवाद साधावा लागेल. त्याच आधारे त्यांचेे शंका समाधान करावे लागेल. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी केलेला त्याग त्यांच्याच भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. अनेक युवांना अधिकारशाहीचे आकर्षण वाटू शकते. पण लोकशाहीचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवावे लागेल.
ऑनलाईन व्यासपीठांवर भरभरून वाहणारे देशप्रेम वास्तवात उतरणे गरजेचे आहे. सुदैवाने युवा सर्जनशील, नवोन्मेषक आहेत. पर्यावरण प्रदूषण, आपत्कालीन घटनांचे वाढते प्रमाण, वन्यजीव आणि मानव संघर्ष, नद्यांची मरणासन्न अवस्था, जलसंवर्धन, सेंद्रीय शेती, जातीभेद अशा विविध समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याची जाणीव त्यांना करून दिली जायला हवी. त्यांची संख्या मात्र वाढायला हवी. अर्थात, या पिढीचे वाढते शारीरिक आणि मानसिक अनारोग्य हा चिंतेचा विषय आहे. पिढी सुदृढ तर देश सुदृढ. बैठी जीवनशैली याचे मुख्य कारण मानले जाते. ही पिढी आरोग्यपूर्ण कशी राहील यावर नियोजनपूर्वक काम करावे लागेल. तसे ते केले जाईल, अशी आशा देशाच्या नेतृत्वाने पल्लवित केली आहे. देश उत्साहाने स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. समस्या कितीही आणि कोणत्याही असल्या तरी ‘हम होंगे कामयाब’ हेच खरे. सगळ्या पातळ्यांवर तोच अनुभवास येवो. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.




