महाराष्ट्राला संतांचा संपन्न वारसा लाभला आहे. ज्याचा नेहमीच गौरवाने उल्लेख केला जातो. संतांचे साहित्य आणि विचार कालातीत असतात. ते काळाच्या कसोटीवर सापेक्षतेने उतरतात. संतांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार आणि साहित्य नेहमीच प्रेरणादायी आहे, असे मत न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी नुकतेच व्यक्त केले.
संतांचे विचार निश्चितपणे समाजाला दिशा देणारे आहेत हे निर्विवाद. त्यांनी समाजात जीवनमूल्ये रुजवली. आचारधर्म सांगितला. समाजाला क्षमाशीलता शिकवली. क्रोध, मोह, निराशा अशा अनेक दुर्गुणांवर विजय कसा मिळवावा याचे सोपे मार्ग अभंगांमधून विशद केले. ज्ञानेश्वरी-गीता असे महान ग्रंथ जीवन कसे जगावे, कोणत्याही परिस्थितीत मन संतुलित कसे ठेवावे याचा मार्ग आखून देतात. सगळ्या संतांनी माणसांच्या मनावर कर्मयोग ठसवण्याचा प्रयत्न केला. मनाचे श्लोक हे तर मनाच्या मशागतीचे व प्रशिक्षणाचे साधन मानले जाते. त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेचा संस्कार केला. संतांच्या साहित्याचा अभ्यास करायला आयुष्यदेखील पुरणार नाही असे अनेक अभ्यासक सांगतात.
पण सद्यस्थितीत तो अभ्यास करावा आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जगावे किती लोकांना वाटत असू शकेल? केवळ संतच नव्हे तर समाजसुधारकांच्या विचारांमधील जेवढे सोयीचे वाटतील तेवढेच मुद्दे सोयीनेच वापरण्याची खोड सर्वांनाच पडलेली आढळते. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजर्या केल्या की त्यांच्याप्रती समाजाचे उत्तरदायित्व संपले असा भ्रम पसरलेला आढळतो. शिवाय अशी निमित्ते वगळली तर एरवी संतांच्या विचारांची आठवणदेखील येत नसावी. अन्यथा मानवी वर्तनदोष वाढले नसते. कीर्तने, प्रवचने हे संत विचारांच्या प्रसाराचे एक प्रमुख साधन आहे. पण आता ते कालबाह्य ठरवले गेले आहे. आचरणातच आणले जाणार नसतील तर संतांच्या विचारांचा वारसा युवा पिढीकडे जाणार कसा हा खरा प्रश्न आहे.
युवा पिढीला मानसिक आरोग्याचे अनेक प्रश्न भेडसावतात. अनेकांना निराशा ग्रासते. विविध प्रकारचे ताण असतात. काहींना क्रोध आवरता आवरत नाही. मानसिक अनारोग्यावर संत साहित्यात उत्तरे सापडतात, असे अभ्यासक सांगतात. व्यायाम, योगा आणि ध्यानाद्वारे मनःशांतीचा तुलनेने काहीसा सहज मार्ग संतांनी घालून दिला आहे. न्यायाधीश महोदयांनादेखील तेच असावे. ‘जुने ते सोने’ या म्हणीची काहीवेळा समाज माध्यमांवर खिल्ली उडवली जाताना आढळते. तथापि ती म्हण संत विचारांना चपखल लागू पडते. लोकांना त्याची जाणीव जेवढी लवकर होईल आणि ती होऊ दिली जाईल तो सुदिनच म्हटला जाऊ शकेल.