सृष्टीला हंगामी पावसाचे आणि अलीकडच्या काळात नाशिककरांना शहरात जागोजागी पाऊस आणि गटारीचे पाणी तुंबण्याचे वेध एकदमच लागतात. पावसाळ्यात शहर अनेकदा पाण्यात जाते. गटारी आणि नाले तुंबून त्यांच्या सांडपाण्याची भर त्यात पडते. असे झाले की सामान्यतः कमी दिवसात धो धो पडणार्या पावसाचे कारण पुढे केले जाते. पाण्याचे प्रवाह खूप वेगाने वाहातात असेही सांगितले जाते. तथापि थोडा जरी पाऊस पडला तरी नाले तुंबतात. नदीबरोबरच रस्ते आणि गल्लीबोळातही सांडपाण्याचा पूर येतो. दरवर्षी असेच घडते. मग वर्षानुवर्षे किंवा पावसाळापूर्व सफाई नेमकी कशाची पार पडते? नाल्यांची की सरकारी तिजोरीची?
नालेसफाईच्या निविदा निघतात. कंत्राटही दिले जाते. कोट्यवधींचा निधी खर्ची पडतो. पण पावसाळ्यात नालेही तुंबतात आणि शहरेही बुडतात. पहिल्या पावसाच्या लोकांच्या मनोवेधक आठवणी असतात. पहिला पाऊस सर्वांनाच खुणावतो. तथापि नाशिककरांना मात्र पहिल्याच पावसात तुंबणारे रस्ते आठवत असतील का? नियोजनाप्रमाणे नालेसफाई होते की नाही हे तपासणारी यंत्रणा महानगरपालिकेकडे आहे की नाही? त्याची जबाबदारी कोणाची? शहरात घाण पाणी तुंबल्यावर कोणत्या अधिकार्यांना त्याचा जाब विचारला जातो? अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून कारवाई केली जाते का? की तो भर कंत्राटदारावर टाकावा? याची उत्तरे जनतेला मिळू शकतील का? प्रशासनाकडे बोट दाखवताना एक बोट लोकांकडेही रोखले जाते.
या समस्येला फक्त प्रशासनाचे दुर्लक्षच हे कारण नाही. लोकांची बेफिकिरी देखील तितकीच जबाबदार आहे. बहुसंख्य नाले तुंबण्यात प्लास्टिक एक महत्वाचे कारण आहे. वास्तविक एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे. तरीही त्याचा वापर आढळतो. लोकही मागचा पुढचा विचार न करता अशा वस्तू इतस्ततः फेकतात. वाट्टेल तिथे कचरा टाकून कचर्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ तयार करतात. पावसाच्या पाण्याबरोबर हेच प्लास्टिक नदीपात्रात जाते. नाल्यांमध्ये जाऊन बसते.
परिणामी नाले वारंवार तुंबतात. पावसाळ्यात तर परिस्थिती अजूनच गंभीर बनते. तेच घाण पाणी लोकांच्या घरात देखील शिरते. वातावरणात दुर्गंधी सुटते. साथीचे रोग बळावतात. लोकांचे आरोग्य धोक्यात येते आणि नाले लोकांमुळे देखील तुंबतात अशी सबब पुढे करून प्रशासनाला सुटका करून घेता येऊ शकते. पावसाळा येऊ घातलाय. यंदा यापेक्षा वेगळी स्थिती लोकांना अनुभवास येईल का? की यंदाही नालेसफाईची रडकथा मागच्या पानावरुन पुढे सुरु राहील आणि शहरे घाण पाण्यात बुडतच राहातील?