गुकेश डोम्माराजू हे नाव गेले दोन तीन दिवस देशातील बहुसंख्य माणसांच्या ओठावर आहे. जे कालपर्यंत सामान्य लोकांना फारसे माहीत नव्हते. त्याने रचलेला पराक्रमच तसा आहे. वयाच्या अठराव्या वर्षी तो जागतिक बुद्धिबळ विजेता बनला आहे. त्याचा फक्त खेळच जगावेगळा आहे असे नाही. त्याचे व्यक्तिमत्त्वच जगावेगळे आहे असे म्हणणे चुकीचे ठरू नये. ‘अठरावं वरीस धोक्याचं’ अशी मराठी म्हण आहे. त्यालाच अडनिडे वय मानले जाते. याच वयात मुले त्यांचे अवकाश शोधण्याचा प्रयत्न करत असले तरी मानसिक अस्थिरता असू शकते. अनेक क्षितिजे त्यांना खुणावतात. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाढते.
मनाची एकाग्रता साधणे अनेकांना कठीण जाऊ शकते. गुकेशचे व्यक्तिमत्व आणि त्याने मिळवलेला विजय या सगळ्या गृहीतकांना धक्का देतो. विलक्षण एकाग्रता, कमालीचा संयम, भावभावनांचे नियमन, नम्रता आणि समर्पण ही त्याच्या व्यक्तिमत्वाची, पर्यायाने त्याच्या खेळाची वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतील. जगज्जेतेपदाच्या सामन्यातील ताण तर त्याने योग्य प्रकारे हाताळलाच पण विजय मिळवल्यानंतरही त्याने ज्याप्रकारे त्या भावनांचे नियमन केले ते युवा पिढीसाठी एक उदाहरण ठरावे. आयुष्यात मिळवलेल्या छोट्या यशाचे देखील समाजमाध्यमांवर ढोल पिटण्याचे दिवस आहेत. तथापि जागतिक पातळीवर सर्वोच्च यश मिळवूनही त्याचा तोल गेला नाही.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी व्यायाम करायला वेळच मिळत नाही हे युवा पिढीचे जणू ब्रीदवाक्य आढळते. तथापि केवळ विलक्षण कसोटीच्या वेळीच नव्हे तर एरवीही मन:शांतीसाठी योग, ध्यानधारणा करतो असे गुकेशने माध्यमांना सांगितले. छोट्यामोठ्या कारणांवरून युवा आत्महत्या करतात. तथापि शेवटपर्यंत खेळ सोडून द्यायचा नसतो-पराभव पत्करायचा नसतो हे त्याने कृतीतून दाखवले. त्याचा विजय युवापिढीसाठी प्रेरणादायी आहे. असे विजय अनेकार्थांनी आवश्यक असतात. क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांकडे समाजचे लक्ष वेधून घेतात. त्या खेळांचे आकर्षण वाढवतात.
खेळाला ग्लॅमर मिळवून देतात. हेही खेळ प्रसिद्धी, मानमरातब आणि काही प्रमाणात आर्थिक स्थिरता मिळवून देऊ शकतात-माध्यमांचे लक्ष वेधून घेतात अशी भावना युवा पिढीत निर्माण होऊ शकेल. त्याच्या पालकांचा त्याला पाठिंबा होता हे त्याने आवर्जून सांगितले. त्याच्या पालकांचा दृष्टिकोन अनुकरणीय आहे. अन्यथा थोडे मोठे झाल्यांनतर मुलांनी खेळात वेळ वाया घालवू नये अशीच बहुसंख्य पालकांची भावना आढळते. वर्तमानात जगणे विसरलेले युवा एकतर भूतकाळात जगतात किंवा भविष्यात रमतात. परिणामी छोट्या छोट्या क्षणांचे आनंद घेणे विसरतात. या पार्श्वभूमीवर खेळाचा आनंद घ्या असा संदेश त्याने युवांना दिला. तोही लाखमोलाचा आहे.