Wednesday, February 4, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : १६ डिसेंबर २०२५ - अनुभवाचे कानमंत्र

संपादकीय : १६ डिसेंबर २०२५ – अनुभवाचे कानमंत्र

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधामुळे रोजगाराच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्याचा कानमंत्र मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि मायक्रोसॉफ्ट भारत अध्यक्ष पुनीत चांडक यांनी भारतीय युवांना सांगितला. काळाबरोबर बदलत राहाणे, नवनवीन तंत्रज्ञान शिकत राहाणे आणि कामाचा आवाका वाढवत राहण्याला पर्याय नाही, असा त्यांच्या कानमंत्राचा मतितार्थ आहे. निवृत्त होईपर्यंत कायमस्वरूपी आणि सुरक्षित नोकरी करणारी कदाचित सध्याची शेवटची पिढी असेल असेही त्यांनी निदर्शनास आणले.

- Advertisement -

कृत्रिम बुद्धिमत्ता कोणाचीही नोकरी हिसकावून घेणार नाही. नवीन गोष्टी शिकणे नाकारण्याची प्रवृत्तीच नोकरी धोयात आणेल. ठराविक शिक्षण घेऊन त्याच्या बळावर नोकरी करणे आता संपुष्टात येण्याचा काळ आहे, असेही त्यांनी लक्षात आणून दिले. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचे श्रेष्ठत्व वेगळे सांगायला नको. दोघांचेही हे अनुभवाचे बोल आहेत. ज्यातील मर्म युवांना लक्षात घ्यावे लागेल. सध्या बहुसंख्य युवांमध्ये या प्रेरणेचा अभाव आढळतो. तयार नोकरीकडे त्यांचा कल असतो. सरकारी नोकरी हेच बहुसंख्यांचे स्वप्न असते. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी नुकताच नागपूरमध्ये रोजगाराच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत या सर्वांनी प्रशिक्षण घेतले आहे. कोणतेही शिक्षण बुद्धिमत्तेचा विकास करते. दृष्टिकोन व्यापक करते. त्या क्षमतेचा उपयोग करून युवांनी स्वयंरोजगाराचे मार्ग शोधणे अपेक्षित असते, हेच नाडेला आणि चांडक यांना सुचवायचे असू शकेल.

YouTube video player

अनेक जण त्या मार्गाचे पथिक आहेत. भारतात सरकारमान्य सुमारे दोन लाख स्टार्टअप आहेत. त्यात सुमारे शंभर कंपन्या ‘युनिकॉर्न’ आहेत. म्हणजे त्यांचे मूल्य अंदाजे साडेआठ हजार कोटी रुपये आहे. ज्यांनी रोजगार निर्माण केले आहेत, त्यांची संख्या वाढत जायला हवी. यू ट्यूब किंवा समाजमाध्यमे हे बहुसंख्यांच्या मनोरंजनाचे साधन मानले जाते. तथापि त्या माध्यमाची नाडी ओळखून, तशा क्षमता अंगी बनवून अनेकांनी ते आर्थिक व्यवसायाचे साधन बनवले आहे. चौकटीबाहेरचा दृष्टिकोन, विचार स्वातंत्र्य, लक्ष्य निश्चिती, निरंतर प्रयत्नांची पराकाष्ठा, संकटांचा सामना करण्याची क्षमता, हार न मानण्याची वृत्ती ही युवांची अंगभूत वैशिष्ट्ये बनायला हवीत. मराठी भाषेतील ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन’ ही म्हण येथे चपखल ठरू शकेल. या प्रवृत्तीची पाळेमुळे शिक्षणपद्धतीत देखील रुजणे आवश्यक आहे.

भविष्याचा आणि बदलत्या काळाचा वेध घेऊन त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल करणे ही काळाची गरज आहे. शिक्षणतज्ज्ञ त्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेतात. त्या दिशेने आयआयएम मुंबईने पाऊल टाकले आहे. डिजिटल सायन्स आणि बिझिनेस मॅनेजमेंट यांची सांगड घालणारा अभ्यासक्रम संस्थेने तयार केला आहे. डिजिटली सक्षम युवा व्यवसायाचे नेतृत्व यशस्वीपणे करू शकतील. असे व्यावसायिक घडवण्याचे प्रयत्न या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे संस्थेने माध्यमांना सांगितले. शालेय स्तरावर देखील बदल स्वीकारले जायला हवेत. स्वतंत्र विचार करण्यास प्रवृत्त करणारी, प्रश्न विचारण्यास प्रेरणा देणारी, विद्यार्थ्यांचे ‘ऐकून’ घेणारी, त्यांना त्यांचा आतला आवाज-क्षमता शोधण्यास साहाय्यभूत ठरणारी शिक्षणपद्धती अवलंबावी लागेल. मुलांच्या मनात भविष्याचा वेध घेणारी स्वप्ने पेरली जायला हवीत. सरकारी पातळीवर छोटे छोटे उपक्रम सुरू असतात.

उदाहरणार्थ, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इस्रो आणि नासा वारी, उपग्रहांच्या बांधणीत विद्यार्थ्यांचा सहभाग ही त्याची काही उदाहरणे ठरू शकतील. इस्रो किंवा नासाला भेट देणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया या दिशेने उत्साहवर्धक ठराव्यात. तथापि असे बदल नव्या सरकारचे नऊ दिवस ठरायला नकोत. दुर्दैवाने सरकार बदलले की शैक्षणिक धोरणे बदलण्याचा प्रघात आहे. योजना व उपक्रमांच्या बाबतीत धरसोड वृत्ती आढळते. नवे काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी आढळते. धोरणानुसार काम करण्यापेक्षा नवनव्या, आकर्षक घोषणांचा मोह कोणीच टाळू शकत नाही हा कळीचा मुद्दा ठरावा. शिक्षणक्षेत्रातही राजकारण अनुभवास येते. हे सगळे उपरोक्त कानमंत्राच्या मतितार्थाला मारक ठरू शकेल. सुदैवाने भारतात नवा विचार करणार्‍या युवांची संख्या लक्षणीय आहे. सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरे शोधण्याची प्रवृत्तीही वाढती आहे. तिला खतपाणी घालणारे बदल सार्वत्रिक पातळीवर होत जाणे किती गरजेचे आहे हेच नाडेला आणि चांडक यांनी सुचवले आहे.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...