राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सभा, मिरवणुका, प्रचार यात्रा आणि भेटीगाठी यांना शब्दशः पूर आला आहे. प्रत्येक निवडणुकीचे एक वेगळेपण सांगितले जाते. या निवडणुकीचे एक न सांगण्यासारख्या वेगळेपणाचा अनुभव लोक रोज घेत आहेत. प्रचाराची खालावलेली पातळी आणि विचारधारेला तिलांजली हे ते नकोसे वेगळेपण. ‘अनंत वाचाळ, बरळती बरळ’ अशीच प्रचाराची परिस्थिती आहे. अरे-तुरेची भाषा, प्राण्यांच्या नावाने लावली जाणारी विशेषणे, अनादराने केला जाणारा एकेरी उल्लेख हीच बहुसंख्यांच्या प्रचाराची भाषा झाली आहे. दुर्दैवाने याला कोणीही अपवाद आढळत नाही. सगळे एकाच माळेचे मणी आढळतात.
प्राणी-पशू-पक्षी यांना बोलता येत नाही म्हणून, अन्यथा त्यांच्या नावाचा गैरवापर केला आणि त्यांची प्रतिमा खालावली म्हणून त्यांनी बहुसंख्य नेत्यांवर मानहानीचा आणि नुकसान भरपाईचा दावा नक्की ठोकला असता. वयाची 80-90 दी गाठलेल्या व्यक्तींना जुन्या निवडणुकीच्या आठवणी विचारण्याची प्रथा अलीकडच्या काळात रुजलेली आढळते. त्यातील अनेकजण त्यांनी ऐकलेल्या सभांच्या आठवणी सांगतात. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी, मृणाल गोरे, एस.एम.जोशी अशा काही नावांचा उल्लेख सारखाच आढळतो. त्यांचे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, तशीच भाषा, विरोधी असले तरी एकमेकांविषयीचा आदराने उल्लेख याचा प्रभाव आजही त्यांच्यावर आढळतो.
विचारधारेला विचारधारेनेच विरोध लोकांनी अनुभवला. आता विचारधारा फक्त तोंडी लावण्यापुरतीच उरली असावी का? सत्तेच्या राजकारणासाठी तिला तिलांजली देणेच सोयीचे मानले जात असावे का? विचारधारेचे जातीपातींसारखे झाले असावे. एरवी जयघोष करायचा आणि सत्तेचे गणित जुळवण्यासाठी पडद्यामागे त्यांचाच सारीपाट मांडायचा. जातीचेच उदाहरण घेता येऊ शकेल. लोकांनी जातींचा त्याग करावा आणि एकत्र यावे असे सर्वच नेते आणि त्यांचे पक्ष सातत्याने सांगतात. राणाभीमदेवी थाटात भाषणे ठोकतात. पण निवडणुका जवळ आल्या की त्यांच्याच शब्दांचा त्यांना विसर पडतो आणि तिकीटवाटपाचा जात हाच एक निकष बनवला जातो.
मराठी भाषेचा गौरव करणारे कितीतरी श्लोक, अभंग, कविता आणि गाणी सांगितली जाऊ शकतील. तथापि अमृतातेही पैजा जिंकणारी भाषेला सर्वांनीच कुरुपता बहाल केली आहे. वाटेल ते वाटेल तेव्हा बोलणे म्हणजेच प्रचार अशी नवी व्याख्या सर्वांनी मिळून उदयाला आणली आहे. शब्द हे दुधारी शस्त्र आहे, असे मानले जाते. म्हणूनच ‘शब्दों को तोलीये, फिर मुहं खोलीये’ असा इशारा आणि ‘शब्द सम्हारे बोलिये, शब्द के ना हाथ न पाव’ असा सल्ला संत कबीर देतात. तथापि सत्तासुंदरीची भुरळ पडलेल्या सर्वांनाच तो इशारा आणि सल्ला कसा मानवावा? परिणामी भाषा आणि शब्दांची मोडतोड सुरूच राहील अशीच लोकभावना आहे.