नाशिक एकलहरे येथील राज्यस्तरीय प्रशिक्षण व सुरक्षा केंद्रातील बाग आता शुद्धीकरण केलेल्या सांडपाण्यावर फुलणार आहे. त्यासाठीच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. यातून वर्षाला सुमारे दहा लाख लिटर पाण्याची बचत होईल, असे सूत्रांनी माध्यमांना सांगितले. यासाठी महावितरण कंपनीने पुढाकार घेतला आहे. तो स्वागतार्ह आहे. असा पुढाकार राज्यातील बॉश, महिंद्रासारख्या अनेक मोठ्या कंपन्यादेखील घेतात. त्यांची संख्या वाढणे काळाची गरज मानली जाऊ शकेल. कारण सांडपाणी व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या आहे.
ज्या-ज्या शहरांना नदीचा वारसा लाभला आहे, त्या-त्या शहरांमध्ये सांडपाणी नदीपात्रात थेट मिसळताना आढळते. परिणामी बहुसंख्य नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अनेकदा धोक्यात येते. वास्तविक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे आणि ती कायर्क्षमतेने चालवणे ही मुख्यत्वे स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी मानली जाते. पण त्यात बहुसंख्य संस्था अनुत्तीर्ण झाल्या आहेत. त्याशिवाय शहरोशहरी सांडपाण्याच्या नद्या वाहिल्या नसत्या.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालानुसार, भारतात दररोज सुमारे 75 अब्ज लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी फक्त सुमारे 40 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच उर्वरित सांडपाणी नदी, समुद्राला मिळते किंवा जमिनीत मुरते. यासंदर्भातील वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. तेव्हा अशाप्रकारचे प्रकल्प संस्था किंवा कंपन्यांनी त्यांच्या पातळीवर चालवले तर सांडपाणी नदीला मिळण्याचे प्रमाण काहीअंशी तरी नक्की कमी होऊ शकेल. नद्यांना मोकळा श्वास घ्यायला थोडीतरी मदत होईल. शिवाय पाण्याची बचतही होईल. पाणीबचत हा पाणीटंचाईवरचा एक प्रमुख उपाय आहे.
बहुसंख्य लोक पाण्याची उधळपट्टी करतात. पाणी वापरतात त्यापेक्षा जास्त पाणी वाया घालवतात. स्नानासाठी जरुरीपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय मुरली आहे. कपडे धुण्यासाठी पाण्याचा जास्त वापर होऊ शकतो. पाण्याचा अतिरिक्त वापर म्हणजे अतिरिक्त सांडपाण्याची निर्मिती. जे प्रक्रिया न झाल्यामुळे थेट नदीच्या पात्रात मिसळते. परिणामी जीवनदायिनी नद्या अनारोग्याचे आगार बनतात. लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाली तर पाण्याचा विवेकी वापर वाढू शकेल. नव्याने बांधल्या जाणार्या गृहनिर्माण वसाहतींना त्यांच्या पातळीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे शासनाने बंधनकारक केले आहे. असे झाल्यास प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर जिथल्या तिथेच होऊ शकेल.