राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिकसह बहुसंख्य महापालिकांवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व मिळवले. आठ वर्षांनी झालेल्या या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी जंग जंग पछाडले होते. या निवडणुकांच्या निमित्ताने झालेले राजकीय संक्रमण मतदारांच्या मनात कमालीचा संभ्रम निर्माण करेल. प्रमुख राजकीय पक्षांचे तुकडे झाले. युत्या आणि आघाड्या फुटल्या. भारतीय जनता पक्ष या सगळ्याला अपवाद ठरला तरी अंतर्गत धुसफूस उघड झाली होती. आयाराम-गयारामांमुळे पक्ष टीकेचा धनी बनलेला आढळला. वॉशिंग मशीन असेही या पक्षाला हिणवले गेले. युतीचा धर्म भाजपने पाळला नाही. युतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपलेसे केले. यामुळे मतदार या पक्षावर नाराज आहेत असे अनेक तर्क निवडणूकपूर्व मांडले गेले.
तथापि, हे सगळे तर्क मतदारांनी काहीअंशी खोटे ठरवले. मतदारांनी त्यांचे मतदान भाजपच्या पारड्यात भरभरून टाकले. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर एकाच पक्षाची सत्ता असली तर ते विकासाला पूरक ठरेल, असा विचार मतदारांनी केलेला असू शकेल. या निवडणुकीत मराठीचा मुद्दा गाजला. उबाठा आणि मनसेना यांनी तो आक्रमकपणे लावून धरला. त्यांची ही भूमिकाही भाजपच्या विजयाला पूरक ठरली असावी. याच आक्रमकतेमुळे उत्तर भारतीय-परप्रांतीय मतदार मोठ्या संख्येने भाजपकडे वळला असावा. तरीही मुंबईचा महापौर मराठीच होणार ही भाजप प्रवक्त्यांची प्रतिक्रिया हा त्याचाच परिपाक आणि मराठी माणसाच्या रेट्याचा परिणाम आहे हे मात्र नक्की. आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीतही मतदारांच्या मनातील पक्ष प्रतिमा कायम राखण्यात भाजपला यश आले.
याव्यतिरिक्त पक्षाचा निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन, रणनीतीची आखणी, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, बंडोबांना थंडोबा करण्याची आखणी याचाही या विजयात मोठाच हातभार आहे हे आता विरोधी पक्षांनाही मान्य करावे लागेल. अत्यंंत छोट्या पातळीवरची निवडणूक पक्ष तितक्याच गंभीरपणे लढवतो. काँग्रेससह अन्य पक्ष जेव्हा महानगरपालिका निवडणुकीच्या नियोजनात रस घ्यायला लागले तेव्हा भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांनी यादीदेखील जाहीर करून टाकली होती. एका निवडणुकीतील विजय साजरा करताना पक्षपातळीवर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू असते असे राजकीय विश्लेषक म्हणतात. त्यातील तथ्य या विजयाने ठसठशीत केले. अनेक प्रकारची अनुकूलता असूनही शिंदेसेनेला मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्याउलट, उबाठाने मुंबई महापालिकेतील सत्ता गमावली असली तरी लढत मात्र चांगलीच दिली. काही ठिकाणी बाजीही मारली.
युतीतील पक्षांनी उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची एकसुद्धा संधी सोडली नाही. पण उद्धव ठाकरे हतोत्साहित झाले नाहीत. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मनसेनेला किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. पण ऐन निवडणुकीच्या धामधूमीत सेना-मनसेना युतीचा उद्धव ठाकरे यांना थोडाफार फायदा झाला असू शकेल. त्यांनी एकत्र येण्याचे धाडस दाखवले तेही कौतुकास पात्र ठरले. कारण ते एकत्र येण्याचे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले होते. ते वजन उबाठाच्या पारड्यात पडले असू शकेल. आगामी काळात विरोधी पक्ष म्हणून हाच आक्रमकपणा त्यांनी कायम ठेवावा, अशीच कार्यकर्त्यांची इच्छा असणार. एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री ठरवणार्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेमके काय सुरू आहे हे त्यांचे प्रमुख कार्यकर्तेसुद्धा सांगू शकणार नाहीत कदाचित. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी खूप गवगवा केला. भाजपशी पंगाही घेतला. पण या दोन्हींसह अन्य ठिकाणी त्यांचाही फार प्रभाव दिसला नाही. काँग्रेस पक्षाचा उल्लेख अपरिहार्य ठरू शकेल. त्यांच्याही पारड्यात काही नगरसेवकांचे दान मतदारांनी टाकले.
वास्तविक, काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली खरी, पण पुढे फारशा हालचाली आढळल्या नाहीत. केंद्रीय-राज्यपातळीवरील प्रमुख नेत्यांनी दौरे केले, असेही मतदारांच्या अनुभवास फारसे आले नाही. तरीही या पक्षाचे ज्येष्ठ मतदारांच्या मनात स्थान आहे. मध्यममार्गी लोकांना अजूनही काँग्रेसकडून आशा आहेत, असाच याचा अर्थ आहे. काँग्रेसकडे एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनच बघितले जाते. यातील मर्म काँग्रेसधुरिण लक्षात घेतील का? तात्पर्य, या निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षांनी आपापली संस्थाने राखण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजपला लक्षणीय यश मिळाले तर मनसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची अस्तित्वशून्य होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असावी, असेही म्हटले जाऊ शकेल.




