Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १७ मार्च २०२५ - गांभीर्याने घेण्याची बाब

संपादकीय : १७ मार्च २०२५ – गांभीर्याने घेण्याची बाब

छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेने सामाजिक असुरक्षितता तर अधोरेखित केलीच पण बहुसंख्य पालकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण केले असणार. ज्याची उकल सरकारनेच नेमलेल्या दामिनी पथकाने केली आहे. एका शाळेतील पाच मुली नशेच्या गर्तेत सापडल्याचे दामिनी पथकाने उघड केले. पथकाने एका मुलीला बालसुधारगृहात तर दुसरीला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

एक मुलगी नशेत तिच्या पालकांना मारहाण करायची, असेही पथकाच्या सदस्यांनी माध्यमांना सांगितले. या घटनेने खळबळ उडवली नसती तरच नवल? ही एक घटना उघडकीस आली म्हणून, अन्यत्र अशा घटना घडत नसतील कशावरून असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. व्यसनांचे दुष्टचक्र शाळकरी मुलांपर्यंत पोहोचते कसे? मुले एका दिवसात व्यसनाधीन होत नाहीत. त्याची सुरुवात छोटीशी असते. मुले गर्तेत सापडेपर्यंत शाळा, शाळेतील कर्मचारी-शिक्षक आणि मुलांचे पालक काय करतात? मुलांचे बदलते वर्तन त्यापैकी कोणाच्याच लक्षात आले नसावे हे पटणे कठीण वाटते.

- Advertisement -

सामाजिक बदनामीच्या भीतीने त्याकडे डोळेझाक केली असू शकेल का? या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्याची आणि या घटनेची देखील पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. तरीही मुलांच्या संगोपनाची पालकांची जबाबदारी जास्त आहे हे निःसंशय. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि समाजमाध्यमांचा बोलबाला असलेल्या काळात पालकत्व आव्हानात्मक होत आहे. तरीही बाळाचे आई-बाबा होणे म्हणजेच पालक होणे अशीच बहुसंख्यांची धारणा आढळते. संस्कारक्षम, मूल्ये रुजलेली आणि आनंदी मनाची मुले घडवणे ही पालकांची जबाबदारी आहे. मूल कसे आहे? त्याचा स्वभाव, आवडीनिवडी, मनाचा कल पालकच सांगू शकतात.

मुलांच्या निकोप वाढीसाठी कौटुंबिक वातावरण देखील तितकेच जबाबदार मानले जाते. तथापि या जाणिवेचाच अभाव असावा का? मुले आणि पालक परस्पर संवादाचा देखील अभाव आढळतो. अनेक पालकांसाठी मूल शाळेत जाते एवढेच पुरेसे ठरत असावे. पण त्याचे मित्र, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, साथसंगत यावर लक्ष ठेवणे किती पालक गरजेचे मानतात? बदलत्या आर्थिक कारणांमुळे बहुसंख्य घरांमधील दोघेही पालक कमावते असतात.

तथापि ज्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी पालक इतकी धडपड करतात त्या मुलांच्या मानसिक जडणघडणीचे काय? खरे तर तोच त्यांच्या भवितव्याचा खरा पाया असतो. ज्याचा पाया भक्कम ती इमारत देखील भक्कम. मुलांना पालकांचा आरसा मानतात. त्यादृष्टीने मुले आणि पालकत्व याचे सतत भान बाळगणे ही काळाची गरज आहे. शाळांना देखील या प्रवासातील त्यांची जबाबदारी टाळता येऊ शकेल का? प्रश्न गुंतागुंतीचे असू शकतील पण त्यांची उत्तरे शोधून सातत्याने आत्मपरीक्षण करत राहण्याला दुसरा पर्याय नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...