वातावरण अजूनही ढगाळ असले तरी अवकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. तथापि गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या कोसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सुमारे सव्वापाचशे हेक्टर शेती क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. कांदा हे नाशिकचे मुख्य पीक मानले जाते. उद्ध्वस्त शेती क्षेत्रात कांद्यासहित विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे.
राज्याच्या कृषिमंत्र्यांनी तातडीने पंचनामे केले जातील असे माध्यमांना सांगितले. शेतीच्या दृष्टीने तीनही ऋतू बेभरवशाचे झाले आहेत, अशी शेतकर्यांची भावना आहे. हवामान बदलाचा शेतीला मोठाच फटका बसतो. शेतात तरारलेले पीक शेतकर्याला समाधान देते. तथापि हवामान बदलाचा एक फटका हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतो आणि शेतकरी हतबल होतात. म्हणूनच शेती करणे परवडत नाही, ही सार्वत्रिक भावना आढळते. त्यांच्या मुलांनी शेती करावी असे बहुसंख्य शेतकर्यांना वाटत नाही.
हवामान बदल हा जागतिक चिंतेचा विषय आहे. हवामान बदलाची तीव्रता कमी करणे हा जागतिक पातळीवर धोरणाचा विषय आहे. पण शेतकरी त्यांच्या पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक शेती करण्याचा प्रयत्न करू शकतील. कारण हवामान बदल आणि त्याचे विपरीत परिणाम होतच राहतील. त्यावर मार्ग शोधणे मात्र त्यांच्याच हातात आहे. अशा परिस्थितीतही अनेक शेतकरी त्यांची शेती फायद्याची करतात. नाशिक जिल्ह्यातही असे शेतकरी आहेत. अशा शेतकर्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध होतात. पुरस्कार देऊन सरकार त्यांचा गौरवदेखील करते. त्यांना हे कसे जमले हा समजून घेण्याचा आणि शक्य ते बदल स्वीकारण्याचा विषय ठरू शकेल.
मातीचे आरोग्य, त्यानुसार पिकाची निवड आणि पाण्याची गरज, खत मात्रा, हवामानातील बदल आणि त्याचा अंदाज घेऊन कीड व्यवस्थापन अशा अनेक पातळ्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकेल. सध्या एआय चर्चेत आहे. सातारा जिल्ह्यात एका शेतकर्याने त्याचा शेतीत उपयोग करून घेतला. एआयच्या मदतीने ते डाळिंब शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहेत. सेंद्रीय शेतीचाही पर्याय शेतकर्यांपुढे आहे.
सेंद्रीय शेती परवडत नाही हा समज अनेक शेतकरी त्यांच्या पातळीवर निकाली काढतात. सेंद्रीय शेती फायद्याची करतात. ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ हे जरी खरे असले तरी आव्हानांवर मात ज्याची त्यालाच करावी लागते. मग ते क्षेत्र कोणतेही असो. शेती क्षेत्रही त्याला अपवाद नाही. हे अनेक युवा शेतकर्यांना उमगत आहे हा बदल निश्चित सुखद आहे.