Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १७ सप्टेंबर २०२४ - केल्याने होत आहे रे...

संपादकीय : १७ सप्टेंबर २०२४ – केल्याने होत आहे रे…

जिद्द हा माणसाचा स्थायीभाव आहे. माणसाने ठरवले तर जिद्दीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना तो करू शकतो. उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यात रधिया देवरिया गाव आहे. या गावातील मुले आणि मुली जलतरणात लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे त्यांचे स्वप्न आहे. गावातील तलावात ते जलतरणाचा सराव करतात. हवामान आणि वातावरण कसेही असले तरी ते दररोज पहाटे तलावावर पोहोचतात.

चार तास कठोर मेहनत घेतात. त्यातील सौम्या, अंकिता आणि प्रियंका राष्ट्रीयस्तरावर खेळल्या आहेत. सौम्याने राष्ट्रीयस्तरावर कांस्य तर राष्ट्रीय सबज्युनियर जलतरण स्पर्धेत अजितने सुवर्णपदक पटकावले आहे. पन्नासपेक्षा जास्त मुलांनी जलतरणाच्या बळावर सरकारी नोकरी मिळवली आहे. आता ऑलम्पिकमध्ये खेळणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यांचा हा प्रवास प्रसिद्धी माध्यमात सविस्तर प्रसिद्ध झाला आहे.

- Advertisement -

‘केल्याने होत आहे रे..’ असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. त्यांचा हा उपदेश या मुलांनी आचरणात आणला आहे. समाजासाठी तो प्रेरणदादायी ठरावा. मुले त्यांच्या वयानुरूप स्वप्ने बघतात. अनेक जण आयुष्याचे ध्येय ठरवतात. अधिकारी बनणे, खेळात विक्रम रचून पदकांची लयलूट करणे, उत्तम गुण मिळवणे, कॅम्पस सिलेक्शन अशा अनेक स्वप्नांचा त्यात समावेश असतो. तथापि अनेक जण ठरवलेले ध्येय कष्टसाध्य आहे हेच विसरतात. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता…’ या उक्तीचा त्यांना विसर पडू शकतो. अशा व्यक्ती अपयशाला परिस्थिती कारण ठरवतात.

कारणे सांगून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतात. डळमळीत आर्थिक परिस्थिती, मार्गदर्शकांची अनुपलब्धता, साधन-सोयींचा अभाव, पालकांची उदरनिर्वाहासाठी व्यस्तता अशा अनेक कारणांचा त्यात समावेश असतो. व्यक्तिनुसार कारणे बदलतात एवढेच! शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अडचणी अधिक असू शकतात. त्यामागील कारणे खरी असू शकतात. तथापि त्यावर मात करण्याऐवजी ती सांगून अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जातो. कारणे सांगण्याची सवय त्यांना परिस्थितीचा स्वीकार करण्यापासून आणि प्रयत्नांपासून रोखू शकते हे कदाचित अनेकांच्या लक्षातही येत नसेल.

परिणामी काहींना निराशा गाठू शकते. भावनिक असमतोलाचा सामना करावा लागू शकतो. परिस्थिती हाताळता न आल्यास मुले अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना आढळतात. तथापि ध्येयनिष्ठा, जिद्द, समर्पण आणि निर्धार असल्यास कोणतीही परिस्थिती स्वप्नपूर्तीपासून रोखू शकत नाही, हे देवरिया गावातील मुलां-मुलींनी कृतीतून सिद्ध केले आहे. एक छोटेसे गाव ते राष्ट्रीय स्पर्धा आणि सरकारी नोकरी हा त्यांचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी ठरेल!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या