आज जागतिक वारसा दिवस. आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात आलेला वारशाशी संबंधित यावर्षीची संकल्पना आहे. जे गमावणे आपल्याला परवडणार नाही अशा सगळ्या गोष्टी म्हणजे वारसा आणि तो वारसा संवेदनशीलतेने जपण्याचा प्रयत्न सातत्याने करणे म्हणजे संवर्धन अशी वारसा आणि त्याचे संवर्धन याची ढोबळ व्याख्या केली जाऊ शकेल. मानवी हस्तक्षेप, पर्यावरणीय आणि हवामान बदल आणि संघर्ष यामुळे जागतिक पातळीवर अनेक वारसा स्थळे धोक्यात आहेत. उद्ध्वस्त होत आहेत. तथापि भारतात जाणिवेच्या अभावामुळे अनेक शहरांच्या पातळीवरदेखील शहरांचा वारसा धोक्यात आहे. त्या दृष्टिकोनातून नाशिकचा विचार केला तर प्रत्येक नाशिककराचा उर नक्कीच अभिमानाने भरून येईन इतका संपन्न वारसा नाशिकला लाभला आहे.
गोदावरी, तिच्या तीरावर भरणारा कुंभमेळा आणि सह्याद्री ही तर नाशिकची अमीट ओळख. त्याबरोबरीने तिच्या तीरावरचे वाडे, वाड्यांमधील भव्य मंदिरे, तिच्या तीरावर शंभर वर्षे चालणारी व्याख्यानमाला, सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणारे लोक, त्यांची निसार्गाला पूरक जीवनशैली, तिथले जंगल, तिथली जैविविधता, पुरातन वृक्ष, समृद्ध साहित्य परंपरा, विचारवंत कला, खाद्यसंस्कृती, मंदिरे, सगळ्या प्रकारच्या कला, आयुर्वेदाची परंपरा, गडकिल्ले हे सारे त्या वारशाचाच एक भाग आहेत. बाजारपेठेचे ठिकाण ही नाशिकची गेल्या तीनशे वर्षांपासूनची ओळख हादेखील वारसाच आहे. ही ओळख टिकवण्यासाठी आपण दैनंदिन पातळीवर काय करू शकतो याचा विचार लोकांनी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वारसा, तिथला इतिहास याची तुमच्या आयुष्यात काय भूमिका आहे? वारशाची देन काय आहे? त्यातून तुम्ही काय शिकता? तो वारसा का आणि मग कसा जतन करायचा? दैनंदिन आयुष्य जगतानादेखील वारसा कसा जपला जाऊ शकेल, हे समजावून घेणे गरजेचे आहे.
कारण पुढच्या पिढीकडे डोळस दृष्टिकोनासहित वारसा सोपवला जायला हवा. वारसा स्थळांना भेटी देणे हादेखील त्या प्रयत्नांचा एक भाग ठरू शकेल. उदाहरणार्थ गोदावरीतीरी अधूनमधून भेट दिली तर आपुलकी वाढेल. त्यातूनच तिचा इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत होऊ शकेल. नदी तुमची, माझी, सर्वांची आहे, ही भावना दृगोच्चर होऊ शकेल. त्यातूनच तिच्या संवर्धनाची प्रेरणा निर्माण होऊ शकेल. तशी ती निर्माण झाली तर त्या प्रयत्नात व्यापकता कदाचित आपोआपच येऊ शकेल. असाच दृष्टिकोन नाशिकला लाभलेल्या सगळ्या प्रकारच्या वारशाला लागू पडतो. विकासाच्या वाटेवर चालताना वारशाची पाळेमुळे विसरून चालणार नाही. वारसा, त्याचे महत्त्व आणि संवर्धन शालेय पातळीवर शिकवले गेले तर उपरोक्त भावना आपोआपच रुजू शकेल. संवर्धन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्याबाबतीत आरंभशुरता उपयोगाची नाही. ते जबाबदारी आणि संवेदनशीलतेने काम करण्याचे क्षेत्र आहे हे मुलांच्या मनावर ठसू शकेल. जागतिक वारसा दिवसाच्या शुभेच्छा.