Friday, November 15, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १८ जुलै २०२४ - मेहनतीचे फळ

संपादकीय : १८ जुलै २०२४ – मेहनतीचे फळ

सूर्यकुमार यादवने टी-20 सामन्यात घेतलेल्या झेलाचे गारूड कदाचित क्रिकेट रसिकांच्या मनावरून वर्षानुवर्षे उतरणार नाही. त्याच्या त्या कामगिरीची चर्चा करताना आजही क्रिकेट रसिक थकत नाहीत. त्या सूर्यालाही निराशेचा, चंचलतेचा आणि भीतीचा सामना करावा लागला आहे. जे आजच्या पिढीचे परवलीचे शब्द बनत आहेत. थोडे मनाविरुद्ध घडले की अनेक तरुण निराश होतात आणि जगण्यावरचा विश्वास हरवून बसतात.

क्रिकेटच्या भाषेत ‘बॅड पॅच’चा सामना कसा केला? हेही त्यानेच माध्यमांना सांगितले. अनेकदा संघाबाहेर राहण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आता सगळे काही संपले, असे वाटण्याचा काळ असायचा तो, पण मी जिथे उभा आहे तिथून पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी काय करावे लागेल याचाच विचार करायचो. त्यादिशेने जात राहिलो. मेहनत घेत राहिलो. एक ना एक दिवस संघात माझे स्थान पक्के असेल हेच स्वतःला बजावत राहिलो. सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असली तरी तुमचा स्वतःच्या क्षमतांवरील विश्वास ढळू देऊ नका. त्या झेलाची चर्चा होत असली तरी ते सगळे अचानक घडलेले नाही. वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे ते फळ आहे, असे त्याने सांगितले.

- Advertisement -

निराशा सर्वांनाच गाठू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात विश्वासाची, क्षमतांची कसोटी पाहणारे क्षण येतातच. हार न मानता कृतीतून जगण्याची आशा पल्लवित करणे हाच त्यावरचा उपाय आहे, असेच कदाचित सूर्याला सुचवायचे असावे. राजस्थानमधील कोटा शहराची ओळख तरुणांनाही आत्महत्या करणारे गाव अशी होऊ पाहत आहे. लोकसेवा आयोगाच्या किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आले म्हणून आत्महत्या केल्या जातात का? अगदी दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये मनासारखे गुण मिळाले नाहीत म्हणूनदेखील अडनिड्या वयाची मुले मृत्यूला जवळ करतात. निराशेला पराभूत करण्याचे अनेक मार्ग मानसतज्ज्ञ सांगतात. त्यात समुपदेशक, पालक, तरुण, त्यांचा भोवताल किती महत्त्वाचा आहे, हेही वारंवार प्रतिपादित करतात.

नैराश्याचा सामना करण्याचा एक मार्ग सूर्यकुमारने दाखवून दिला आहे. विश्वविजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय असणे स्वाभाविकच! त्याने घेतलेला झेल अनेकांचा डीपी बनला होता. ‘एक्स’वर तरुणांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला होता. तथापि त्याच्यावरचे प्रेम तेवढ्यापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे तकलादूपण ठरू शकेल का? सूर्यकुमार तरुणांसारखाच आहे. फक्त तो घेत असलेली जीवतोड मेहनत त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. युवा पिढी मानत असलेल्या आदर्शाचा फोटो फक्त डीपीपुरता असून चालू शकेल का? प्रत्येकाचे एक स्वप्न असते. ध्येय असते. त्याचा पाठलाग करणे सोडू नका, असा कानमंत्र सूर्यकुमारने दिला आहे. त्यातून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या