प्रयागराजमधील महाकुंभादरम्यान गंगा पाणी प्रदूषणाच्या चर्चेची जागा आता गोदावरीच्या प्रदूषणाने घेतली आहे. गोदेकाठी 2027 मध्ये कुंभमेळा भरणार आहे. निमित्त त्याचे असले तरी गोदेच्या प्रदूषणाची चर्चा अधूनमधून रंगतच असते. गोदावरीचे पाणी मध्यम किंवा चांगल्या दर्जाचे आहे असे प्रदूषण नियंत्रण अधिकारी म्हणतात तर पाणी प्रदूषितच असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा आहे.
भाविकांना मात्र पात्रातील पाण्याची अवस्था वर्षानुवर्षे ‘जैसे थेच’ अनुभवास येते. गोदेच्या वाहत्या पात्राची मजा कधी घेतली होती असा प्रश्न विचारला तर क्वचितच एखादा नाशिककर त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. कारण पावसाळा आणि पाण्याची आवर्तने याव्यतिरिक्त नदी वाहिल्याचे कोणाच्याही आठवणीत फारसे नसावे. जेव्हा की, पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी नदी बारमाही वाहती असणे आवश्यक मानले जाते. 2018 पासूनच या विषयावर वादविवाद रंगतात. गोदावरीचे पाणी वापरायोग्य नसल्याचे आणि आरोग्यास हानिकारक असल्याचे फलक पात्राच्या अवतीभोवती लावावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. असे असतानादेखील पाणी अस्वच्छ राहिले.
अहवाल काहीही म्हणोत आणि निष्कर्ष काढोत भाविक आणि पर्यटकांना जे गोदादर्शन घडते ते फारसे आनंददायी नाही. कचर्याने भरलेले पात्र आणि दुर्गंधयुक्त पाणीच त्यांना दिसते. प्रवाह वाहता करणे सरकारचे काम आहे. त्यासाठी पात्रातील जागोजागचे काँक्रिटीकरण काढणे आणि पात्रातील नैसर्गिक स्रोत मोकळे करणे आवश्यक आहे. जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह देखील तेच सातत्याने सांगतात. कुंभमेळ्यात रामकुंडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तथापि त्याचा तरण तलाव बनल्याची टीकाही त्यांनी केली होती. तात्पर्य, सुमारे 2018 पासून परिस्थिती जशीच्या तशी असतानाही गोदेचे पाणी मध्यम दर्जाचे तरी कसे असू शकेल, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करतात.
जो नागरिकांनाही मान्य असू शकेल कारण गटारींचे पाणी अनेक ठिकाणी थेट नदीपात्रात जाते. मलजल सोडले जाते. प्रक्रिया न केलेले पाणी थेट पात्रात जाते. गोदेशी संबंधित प्रशासकीय निर्णयांवर आक्षेप घेतानाच यासंदर्भातील नागरी कर्तव्याची जाणीव डॉ. राजेंद्रसिंह करून देतात. गोदा स्वच्छ आणि वाहती करण्यासाठी नागरिकांनादेखील लढा उभारावा लागेल, पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी काम करावे लागेल, असे त्यांनी अनेकदा म्हटले आहे. ठिकठिकाणचे पात्र अस्वच्छ होण्यास त्यांच्या काही सवयीदेखील कारणीभूत आहेत.
निर्माल्य आणि कचरा फेकणे, नदीपात्रात कपडे आणि गाड्या धुणे, भाज्यांचा कचरा फेकणे इतकेच नव्हे तर खराब फर्निचरच्या वस्तू टाकण्याचे नदीपात्र हे लोकांना हक्काचे ठिकाण वाटते. केवळ गोदावरीच नव्हे तर तिच्या उपनद्यांची एक सफर केली तर याचे विदारक दर्शन घडते. गोदा प्रदूषणमुक्तीसाठी दावे-प्रतिदाव्यांच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यासाठीचा आराखडा, आर्थिक निधीची तरतूद आणि त्याची कठोर अंमलबजावणी यापुढे नाशिककरांना अपेक्षित असेल.