Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १९ एप्रिल २०२५ - आयुष्य संपवणे हा उपाय नव्हे

संपादकीय : १९ एप्रिल २०२५ – आयुष्य संपवणे हा उपाय नव्हे

विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातदेखील तसे निरीक्षण नमूद आहे. मुलांवर त्यांच्या पालकांचे जीवापाड प्रेम असते. मुलांच्या प्रगतीची स्वप्ने जसे पालक बघतात तसेच मुलेही. त्यांच्या आयुष्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात. अपेक्षा असणे गैर नाही. तथापि त्या अपेक्षांनाच आयुष्य समजणे गैर आहे. तसे मानले जाते म्हणूनच अपेक्षापूर्ती न झाल्याने अनेक मुले त्यांचे आयुष्यदेखील संपवतात.

कोणतीही परीक्षा आयुष्यापेक्षा मोठी नसते. मुलांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मुले, त्यांचे पालक, मित्र आणि शिक्षक यांचा डोळस आणि सक्रिय सहभाग अपरिहार्य आहे. अपयशाने मुलांच्या मनात नकारात्मक विचार येणे स्वाभाविकच. पण ते ओळखायला मुलांनी शिकण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा देणारी मुले जाणत्या वयाची असतात. तारतम्यचा विचार करू शकणारी असतात. उचलले जाणारे प्रत्येक पाऊल आणि त्याचे किमान वरवरचे तरी परिणाम त्यांना माहीत असतात. त्यामुळेच आत्महत्येने प्रश्न सुटत नाही, हेही कदाचित ते जाणून असतील.

- Advertisement -

विचारांची किमान लवचिकता त्यांनी दाखवणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रकारचा ताण हलका करण्याचा संवाद हा खूप सोपा आणि सरळ उपाय मानला जातो. मित्रांकडे-पालकांकडे मन मोकळे करणे, मनाची आंदोलने त्यांना सांगणे दबाव कमी करणारे ठरू शकेल. तसा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करणे, त्याला पोषक वातावरण घरात असणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना मोठे करताना त्यांच्या मनात सकारात्मक-आशावादाची पेरणी करणे, काहीही झाले तरी मुलापेक्षा कोणीतही गोष्ट त्यांच्यासाठी मोठी किंवा महत्त्वाची नाही हे मुलांच्या मनावर कृतीतून ठसवणे, त्यांची कोणाशीही तुलना न करणे, मुलांना व्यायाम-प्राणायाम आणि ध्यान करण्याची सवय लावणे हे पालकांचे कर्तव्यच आहे.

छोटे छोटे छंद जोपासण्यासाठी मुलांना प्रेरणा दिली जायला हवी. एवढेच नाही तर मूल मनाने अस्वस्थ असेल तर समुपदेशकाची मदत घेण्याइतकी समजदारी किती पालक दाखवतात? त्यासाठी वेळ नाही ही सबब उपयोगाची नाही. दुर्दैवाने मुलाने वेडेवाकडे पाऊल उचलले तर वेळ कायमची निघून जाते हे पालक लक्षात घेतील का? परिस्थितीचा स्वीकार हे तिच्यावर मात करणारे पहिले पाऊल ठरते. आयुष्यात चढ-उतार होतच असतात. त्यांचा सामना करायला हवा. तेच खरे माणूसपण आहे. याची शिकवण मुलांमध्ये योग्य वयात रुजली तर वाढत्या वयात त्यालाच धुमारे फुटू शकतात. मुले हार न मानता संघर्ष करतात. यालाच मुलांचे संगोपन आणि संवर्धन मानले जाते. जे फक्त माणसेच करू शकतात. तात्पर्य, हे जीवन सुंदर आहे हेच खरे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...