Friday, November 22, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : १९ ऑगस्ट २०२४ - उपक्रम अमलात यावा

संपादकीय : १९ ऑगस्ट २०२४ – उपक्रम अमलात यावा

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना सामान्य मानल्या जातात. अशा व्यक्तींना तातडीने उपायांची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी ‘क्लिनिक ऑन व्हील्स’ उपक्रम सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत नुकतेच दिले. एरवीही साप चावण्याच्या घटना घडतात, पण पावसाळ्यात त्यात अधिक वाढ होते असे तज्ज्ञ आणि सर्पमित्रांचा अनुभव आहे.

सापाला मानव आणि विशेषतः शेतकर्‍यांचा मित्र म्हटले जात असले तरी त्याच्याविषयी माणसांच्या मनात भीतीच जास्त आढळते. साप चावल्याची नुसती कल्पनाही माणसे करू शकत नाहीत. वास्तवात चावल्याचे कळताच ती व्यक्ती अर्धमेली होते. जसे रस्ते अपघातात अपघात झाल्यावर जखमींना मदत मिळण्याच्या दृष्टीने पहिल्या तासाला ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते, तेच सर्पदंशाला देखील लागू होते. सर्पदंश झाल्यावर तातडीने मदत मिळाली तर त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. उपरोक्त उपक्रम तीच संधी उपलब्ध करून देऊ शकेल. त्यामुळे तो तातडीने अंमलात आणला जावा, अशीच अपेक्षा तज्ज्ञ आणि सर्पमित्र व्यक्त करतात.

- Advertisement -

अन्य योजनांसारखे त्याचे होऊ नये अशीच जनतेचीही इच्छा असणार. अर्थात त्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी त्यात वैयक्तिक लक्ष घालण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक सुसज्जता झाली आहे की कसे याविषयी पुरेशी स्पष्टता उपलब्ध नाही. त्यामुळे या उपक्रमांतर्गत जी गाडी तयार केली जाईल किंवा असेल ती आवश्यक उपकरणे, उपचार सामग्री आणि तज्ज्ञांनी सुसज्ज असावी. सर्पदंशाच्या घटना सामान्यतः गावांच्या अडचणीच्या किंवा झाडाझुडपांच्या ठिकाणी जास्त घडल्याचे आढळते अशा ठिकाणी वेगाने पोहोचू शकेल इतकी ती गाडी मजबूत असावी. त्यासाठी रस्ते किमान धड असतील याची दक्षता प्रशासन घेईल किंवा घेतलेली असेल अशी आशा. ‘उपचारांपेक्षा काळजी घेतलेली बरी’ हे तत्व याबाबतीतही लागू पडते.

सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा याविषयीचे ज्ञान लोकांना देणे हाही उपाय प्रभावी ठरू शकतो. मानव-बिबट्या संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने नाशिकच्या वनविभागाने शाळाशाळांमध्ये ‘ जाणता वाघोबा’ हा उपक्रम राबवला होता. त्या धर्तीवर सर्पदंशाशी संबंधित उपक्रम राबवले जाऊ शकतील. एक विद्यार्थी शहाणा झाला की त्याचे कुटुंब आपोआपच त्याबाबतीत सज्ञान होते आणि मुलांना आलेले शहाणपण त्यांच्या मनावर कायमचे ठसू शकते. या क्षेत्रात जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्त आणि मोफत काम करतात.

उदाहरणार्थ ‘रेस्क्यू नाशिक डिव्हिजन’ही संस्था जागरूकता वाढवण्यासाठी नाशिक परिसरात काम करते. प्रामाणिक आणि निरलस काम करणार्‍या संस्था शोधणे सरकारसाठी अजिबातच कठीण नाही अशा पद्धतीने बहुस्तरीय योजना राबवल्या गेल्या तर कदाचित सर्पदंशाच्या घटना कमी तर होतीलच पण त्या घडू नयेत म्हणून लोकच त्यांच्या पातळीवर दक्षता घेऊ शकतील.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या