मानवी मन ही अनाकलनीय गोष्ट मानली जाते. असे असले तरी मन, मनाची सुंदरता, तरलता, चंचलता आणि एकूणच आरोग्यातील मनाची भूमिका उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आद्य संतांनी, कवींनी आणि साहित्यिकांनी केला. तथापि त्याबाबतीतील समज सामान्य माणसांमध्ये अजूनही तितकी प्रभावी आढळत नाही. किंबहुना मन दिसत नाही त्यामुळे ते सर्वार्थाने आयुष्यावर परिणाम करू शकते याचा स्वीकार बहुसंख्य माणसांनी अद्यापही केलेला नाही. परिणामी मन आजारी पडू शकते, हेच समाजमान्य नाही.
याबाबत जागरुकता वाढवण्याचे सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. त्याला अपवादाने यश येताना दिसते. तथापि सामाजिक बहिष्कार किंवा लोकापवादाच्या भीतीने आजार लपवून ठेवण्याकडेच कल आढळतो. मुंबई उच्च न्यायायालनेदेखील तेच निरीक्षण नोंदवले आहे. समाजाच्या चुकीच्या धारणा याला कारणीभूत आहेत, असेही न्यायसंस्थेने म्हटले आहे. काही जणांच्या बाबतीत मानसिक आजार आनुवंशिक असू शकतील. पण अनेकांच्या बाबतीत ती बाह्य जगाची देणगी असू शकेल. बाह्य जगात तीव्र स्पर्धा आहे. ती सर्वच पातळीवर अनुभवास येते. तेही ताणतणाव वाढण्याचे किंवा मानसिक आंदोलनांचे एक प्रमुख कारण मानले जाते.
निराशा, अतिचंचलता, कमालीचा संताप, भ्रम, विस्कळीत विचार, असहाय्यता, उन्माद, अधीरता, आत्मविश्वासाचा अभाव माणसांना ग्रासू शकते. नव्हे अनेकांना ग्रासते. यासह अनेक विकारांची लक्षणे काही जणांमध्ये वयाच्या लहानपणापासून जाणवू शकतात. त्याला तिला तशी सवयच आहे.. तो संतापी आहे.. संशयी वृत्ती आहे अशा सबबी पुढे केल्या जाताना आढळतात. मनाची अस्वस्थता पाठीशी घातली जाते. दुर्दैवाने वाढत्या वयाबरोबर लक्षणेही तीव्र होत जातात आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका संभवतो. तसे होऊ न देणे माणसांच्याच हातात आहे. शरीराचा आजार पहिल्या टप्प्यात लक्षात आला तर किरकोळ आजार तर लवकर बरे होतातच पण दीर्घ व्याधीदेखील आटोक्यात येऊ शकतात. मनाचेदेखील तसेच आहे.
शरीरासारखेच मन आजारी पडू शकते. मनाचेही डॉक्टर असतात. मनाचे डॉक्टर म्हणजे वेड्यांचे डॉक्टर नव्हे. मनाला होणार्या बहुसंख्य व्याधींवर उपचार असतात. मन आजारी पडलेली माणसे वेडी नसतात. समाज त्यांची तशी संभावना करतो, ते निःसंशय चुकीचेच आहे. या समाजधारणेमुळेच माणसे मनाचे आजार लपवतात. तसे घडणे ती व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय यांच्यासाठी अजिबात हिताचे नसते. त्यामुळे याबाबतीत जागरुकता वाढण्याची गरज आहे. न्यायसंस्थेलादेखील तेच सुचवायचे असावे.