Friday, April 25, 2025
Homeसंपादकीयसंपादकीय : १९ मार्च २०२५ - कर्तृत्व हीच खरी ओळख

संपादकीय : १९ मार्च २०२५ – कर्तृत्व हीच खरी ओळख

जातीपातींच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट प्रहार केला आहे. कोणतीही व्यक्ती तिच्या गुणांवरून ओळखली जाते. जात-पात-धर्म किंवा पंथ यावरून नाही. मला मते मिळोत किंवा न मिळोत पण मी जातीचे राजकारण करत नाही. जो त्याचा पुरस्कार करतो, त्याचा मी नेहमीच धिक्कार करतो, अशी भावना त्यांनी नुकतीच व्यक्त केली. केंद्रातील कार्यक्षम मंत्री अशी गडकरींची ओळख आहे. तसेच, स्पष्टवक्ते म्हणूनही ते ओळखले जातात. उपरोक्त विधाने त्यांची हीच ओळख अधोरेखित करतात. त्यांनी एका गंभीर विषयाला पुन्हा एकदा हात घातला आहे.

जातीपातींच्या विळख्यातून समाजमुक्त करण्यासाठी संत, समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारकांनी आयुष्य वाहिले. शिक्षणाचा वसा देण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यशही आले. तथापि त्यांचे विचार अमलात आणण्यापेक्षा जातीपातींच्या राजकारणावर स्वार्थाची पोळी भाजून घेण्यातच अनेकांना रस वाटत असू शकेल का? किंवा तेच सोपे वाटत असू शकेल का? अन्यथा कोणत्याही निवडणुकीत पडद्यामागे जातीपातींचीच गणिते लोकांच्या अनुभवास आली नसती. त्यासाठीच जातीपाती किंवा भेदाभेद मिटवण्याऐवजी रुजवला जात असावा का? तथापि त्याचे परिणाम समाज वेगवेगळ्या पद्धतीने भोगतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- Advertisement -

आंतरजातीय विवाह समाजात अजूनही स्वीकारार्ह नाहीत. किंबहुना असे करू पाहणार्‍या मुला-मुलींचे जीव घेण्याच्या भयावह घटना अधूनमधून उघडकीस येतात. जातीपातीचा वृथा अभिमान इतका भिनतो की पोटच्या गोळ्याचा जीव घेण्यास त्यांचे पालक मागे पुढे पाहत नाहीत. जातीय दंगलीची संख्या वाढते. त्यात सार्वजनिक संपत्तीची नासधूस होते. निष्पाप नागरिकांचे जीव पणाला लागतात. माणसांची मने दुभंगतात. समाज दुभंगाच्या उंबरठ्यावर उभा राहतो. माणसांना परस्परांविषयी विश्वास वाटेना होतो. इतके सगळे अनर्थ जातीपातींची मुळे खोलवर रुजल्याने घडतात.

व्यक्ती तिच्या गुणांवरून ओळखली जाते असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेने त्यांनी समाजासमोर उदाहरण घालून दिले आहे. तथापि राजकारणात तशी उदाहरणे अगदीच विरळा आढळतील. तेव्हा जातीभेद नष्ट करण्यासाठी निरंतर प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. कारण जातीभेदांची किंमत सामान्य माणसांनाच जास्त मोजावी लागते. त्या दृष्टीने गडकरी यांच्या विधानातील गांभीर्य लक्षात घेतले जाईल का? गुणवैशिष्ट्ये आणि कर्तृत्व हीच व्यक्तीची ओळख बनू शकेल का?

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...