नुकताच जागतिक कुटुंब दिवस जगाने साजरा केला. अनेक पाश्चात्य देशांमध्ये कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याचे नेहमीच बोलले जाते. बहुसंख्य देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक आढळतो. तेथील समाज त्याचे परिणामही भोगतो. मूल्यन हीनता अनुभवतो. कदाचित त्यामुळेच तेथील बहुसंख्य मुलांचे आयुष्य सैरभैर झालेले आढळते. व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक विकासात कुटुंबाच्या योगदानाचे महत्त्व कदाचित जागतिक विचारवंतांच्या लक्षात आले असावे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली असावी. हा प्रमुख उद्देश भारतीयांनी देखील लक्षात घेणे ही काळाची गरज बनत चालली असावी का? कारण भारतात देखील कुटुंबसंस्थेची वीण विसविशीत होत चालल्याचा धोका मानसतज्ज्ञ वर्तवतात.
‘वसुधैव कुटुंबकम्’ किंवा ‘हे विश्वची माझे घर’ या मूल्याची देणगी भारताने समाजाला दिली याचा अभिमान वाटणे सार्थच आहे पण वैयक्तिक जगण्यात ते मूल्य उतरणे हळूहळू दुरापास्त होऊ लागले असावे का? देशात आजही किमान चार सदस्यांची अनेक कुटुंबे आहेत. तथापि फक्त चार माणसे एका छताखाली राहाणे म्हणजे कुटुंब नव्हे. कौटुंबिक बंध निर्माण होऊन दिवसेंदिवस ते घट्ट होत जाणे, एकमेकांसाठी जगणे, अनुकूलता-प्रतिकूलता लक्षात घेऊन वर्तन करणे, आजारपण काढणे, आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा अशा अनेक गोष्टी कुटुंबात अंतर्भूत असतात. मुलांसहित कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद अपेक्षित असतो. त्यामुळे ताण आणि निराशेचे परस्पर निराकरण होऊ शकते.
एकमेकांसाठी जगायचे असेल तर अहंकार, आपपरभाव बाजूला ठेवावा लागतो. असे वातावरण घराला आपोआपच घरपण बहाल करते. स्थैर्य प्रदान करते. ‘नाही’ म्हणण्याची आणि ते ऐकून घेण्याची सवय सर्वांना लागते. अशा कुटुंबात मानसिक आधार वेगळा मागावा लागत नाही. किंवा त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. अशा वातावरणात वाढलेली माणसे त्यांच्याही नकळत सहजच समाजाला त्यांचेच एक कुटुंब मानतात. सामाजिक कामात सहभाग नोंदवतात. समाजाच्या भल्यासाठी झटतात. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे तरी दुसरे काय असते? एखाद्या कुटुंबाचे हे अजिबात जगावेगळे वर्णन नाही. आजच्या युवा पिढीचे पालक याच वातावरणात वाढले. जागतिक कुटुंब दिवसाच्या निमित्ताने आजही अस्तित्वात असलेल्या अशा कुटुंबांची आणि विशेषतः संयुक्त कुटुंबांची माध्यमांनी समाजाला ओळख करून दिली. म्हणजेच कुटुंबसंस्था आजही राखली जाते आहे. कारण तिचे महत्त्व ती ती कुटुंबे जाणून आहेत.
कुटुंबाची व्याख्या आणि तिचे महत्त्व एकदा पटले की काळ कोणताही असो, आधुनिक किंवा अत्याधुनिक माणसे कुटुंब जपू शकतील. शिक्षण किंवा रोजगाराच्या उत्तम संधींच्या शोधात युवा घर सोडतात. त्यांना घरापासून लांब राहावे लागते. पण कौटुंबिक बंध घट्ट असले तर सदस्यांमध्ये अंतर निर्माण होणार नाही. त्यांची मने जोडलेलीच राहतील. युवा पिढीचे वाढत चाललेले शारीरिक आणि मानसिक प्रश्न लक्षात घेता जागतिक कुटुंब दिवसाचे मागणे फार नाही. तेव्हा कुटुंबाची वीण अबाधित राखण्यातच सर्वांचे हित दडले आहे.