Tuesday, March 25, 2025
Homeअग्रलेखसंपादकीय : १९ ऑक्टोबर २०२४ - हे कधी थांबणार?

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२४ – हे कधी थांबणार?

समाज माध्यमांवरील तथाकथित प्रसिद्धीचे आकर्षण युवा पिढीला कुठे घेऊन जाईन आणि त्यांचा अजून किती सामाजिक अधःपात घडवून आणेल या कल्पनेने सुजाण माणसे अस्वस्थ आहेत. यावरील माणसांच्या वेडाचाराचा रोज कुठला ना कुठला नवा नमुना माणसे समाजासमोर आणतात. रायपूरमध्ये एक घटना नुकतीच घडली. पत्नीचे समाज माध्यमांवर अकाऊंट होते. त्यावर ती रिल्स टाकायची. त्यामुळे पतीने पत्नीची हत्या केली. रिल्स टाकणे न आवडणे आणि पत्नीवर संशय यामुळे पतीने हे कृत्य केल्याचे प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे.

समाज माध्यमे ही कौटुंबिक विसंवादाचे एक प्रमुख कारण ठरत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. रिल्सच्या वेडापायी युवा पिढी आणि माणसे त्यांचा जीव धोक्यात घालतात. ते बनवण्यासाठी सामाजिक सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करताना आढळतात. त्यांना डोके नसावे का? असा प्रश्न कोणालाही पडावा, असेच अनेकांचे रिल्स दिसतात. रिल्सच्या नादात अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडतात. तरीही याचे आकर्षण कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करतात. अनेकांच्या बाबतीत परिस्थिती त्यांच्या घरच्यांच्या हाताबाहेर जात असू शकेल, अशी शंका यावी इतकी गर्दी मानसोपचारतज्ज्ञांकडे वाढताना पाहावयास मिळते.

- Advertisement -

समाज माध्यमांवरचे आभासी जग आणि वास्तव यातील फरक माणसे विसरत असावीत. तिथले चकाचक आणि रमणीय जगच माणसांना खरे वाटू लागते. तिथेच रमण्याची सवय लागण्याचा धोका वाढत जातो. तिथे सोशल होण्याच्या नावाखाली माणसे त्यांच्या खर्‍या आयुष्यात अनसोशल कधी वागू लागतात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. त्याचेच दुष्परिणाम ती माणसे आणि समाज सहन करतो. मोबाईलचा वापर थांबवणे शक्य नाही. सरसकट तसा विचार करणे काळाच्या संदर्भात योग्य ठरणार नाही. तथापि समस्या माणसांनी निर्माण केली आहे.

तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उत्तरे शोधून ती अमलात आणणे ही माणसांचीच जबाबदारी आहे. उदा. मुलांनी मोबाईलचा वापर कमीच करावा, अशी इच्छा असणार्‍या पालकांना ते आधी आचरणात आणावे लागेल. मोबाईलचा वापर त्यांना मर्यादित करावा लागेल. मुलांशी संवाद वाढवावा लागेल. संवादातून समाज माध्यमांच्या अतिरेकाचे परिणाम ते मुलांना समजावून सांगू शकतील. या माध्यमांचा विवेकाने वापर करण्याची समज समाजात रुजण्याची आवश्यतकता आहे. त्याचे मार्ग सुचवणे ही जशी तज्ज्ञांची जबाबदारी आहे तसेच त्यांनी सांगितलेल्या उपायांचे कसोशीने आचरण ही सर्वांची जबाबदारी आहे. कारण बरे होण्यासाठी औषध रुग्णालाच घ्यावे लागते. या माध्यमांविषयीची सर्वप्रकारची साक्षरता वाढवण्यासाठी सरकारनेदेखील पुढाकार घ्यायला हवा.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...