Thursday, November 21, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २ नोव्हेंबर २०२४ - शेतीविषयीचा प्रेरणादायी दृष्टिकोन

संपादकीय : २ नोव्हेंबर २०२४ – शेतीविषयीचा प्रेरणादायी दृष्टिकोन

शेती बिनभरवशाची बनत असल्याची व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करतात. बदलत्या हवामानाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत असल्याचा अनुभव शेतकर्‍यांसह समाज सध्या नेहमीच घेतो. यंदाच्या परतीच्या हंगामी पावसाच्या फटक्याने अनेक ठिकाणची शेती पाण्यात गेली. उद्ध्वस्त झाली. परिणामी शेतकर्‍यांची मुले शेती करत नाहीत किंवा त्यांनी शेती करू नये अशी इच्छा त्यांचे वाडवडील व्यक्त करतात असेही बोलले जाते. तथापि शिकलेले अनेक युवा शेतकरी शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करतात. त्यात यशस्वी झालेल्या शेतकर्‍यांच्या यशोगाथा माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होतात.

उत्तर प्रदेश सीतापूर जिल्ह्यात एक सीए,एलएलबी आणि बी.एडचे शिक्षण घेतलेला एक युवक शेतीत उतरला आहे. सहा वर्षांच्या अथक परंतु डोळस प्रयत्नांमुळे त्याची शेती फायद्याची झाली असल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. अशी उदाहरणे नाशिक जिल्ह्यात देखील आढळतात. माती परीक्षण, सेंद्रिय शेती, बदलत्या हवामानानुसार पीक व्यवस्थापन, शेतीमाल विक्री, बाजाराचा अभ्यास अशा शेतीशी संबंधित विविध मुद्यांचा ते अभ्यास करतात. त्यात प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा शेतकर्‍यांचा शोध घेऊन त्यांचा प्रवास समाजापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम कर्तव्य ‘देशदूत’ नेहमीच पार पडतो.

- Advertisement -

शेती करणे फायद्याचे राहिले नाही हा आक्षेप काही प्रमाणात खराही असू शकेल. तथापि शिक्षित शेतकरी हे चित्र पालटण्याचे प्रयत्न नक्की करू शकतील. ते शेती शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्जनशील युवांनी शेतीपूरक अनेक अ‍ॅप बनवलेले आढळतात. सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक कामे सोपी केली आहेत. शेतकर्‍यांचे प्रत्यक्ष श्रम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भरघोस उत्पादने देणार्‍या विविध जाती विकसित केल्या आहेत. पंतप्रधानांनी अशी काही बियाणे नुकतीच राष्ट्राला अर्पण देखील केली. बाजारभाव आणि बदलता बाजार याचाही परिणाम शेतीवर होतो.

शेतकर्‍यांसाठी अनेक योजना सरकार सतत जाहीर करते. अनेक युवा शेतकरी शेतीत नवे प्रवाह आणतात. प्रयोग करतात. कृषी पणन कायदे आहेत. शिक्षणामुळे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करण्याची क्षमता प्राप्त होऊ शकेल. कोणत्याही क्षेत्रातून फायदा कमवायचा असेल तर संयम बाळगावा लागतो. प्रसंगी नुकसान सहन करावे लागते. निरंतर प्रयत्न सुरूच ठेवावे लागतात. स्वप्रयत्नांवर ठाम विश्वास आवश्यक असतो. शिक्षणामुळे ती गुणवत्ता विकसित होऊ शकेल. अभ्यास, मनन आणि चिंतन शेती फायद्याची करण्यासाठी नक्कीच सहाय्य्यभूत ठरू शकेल. नव्हे ठरते हे सीतापूरमधील युवा शेतकर्‍याने कृतीतून सिद्ध केले अशा युवांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या