Sunday, September 8, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २० जुलै २०२४ - वाचन सवयीच्या दिशेने टाकलेले पाऊल

संपादकीय : २० जुलै २०२४ – वाचन सवयीच्या दिशेने टाकलेले पाऊल

एरवी बहुसंख्यांचे एखाद्या मुद्यावर एकमत होणे अशक्यप्राय मानले जाते. तथापि वाचन संस्कृती उणावत आहे आणि ती रुजवण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत यावर लोकांचे कदाचित एकमत होऊ शकेल, अशी सद्यस्थिती आहे. त्याला पूरक उपक्रम राबवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

आगामी महिनाभर राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे या उपक्रमाचे सदिच्छादूत आहेत, असे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. हा उपक्रम कसा राबवला जाणार आहे, कोणकोणते कायर्क्रम घेतले जाणार आहेत याविषयी माध्यमांत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

वाचन संस्कृती रुजायलाच हवी याविषयी दुमत नाही. तथापि मुलांना वाचनाची सवय का लागत नाही? त्यातील अडथळे कोणकोणते? सवय लागली असेल तर ती का तुटली? हातात पुस्तक घेऊन बसण्याला वाचन म्हटले जाऊ शकेल का? मुलांच्या वयोगटाला साजेशी साहित्यनिर्मिती होते का? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेतला जायला हवा. त्याचा एक भाग म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाऊ शकेल का? एरवी शासन निर्णयाकडे समाज फारसे गांभीर्याने बघताना आढळत नाही. किंबहुना बहुसंख्य शासन निर्णयांकडे टीकात्मक दृष्टिकोनातूनच पाहिले जाते.

जनतेचे अनुभव त्यात भर घालतात. तथापि वाचन महोत्सवाकडे केवळ एक सरकारी उपक्रम म्हणून पाहिले जाऊ नये अशीच जाणत्यांची अपेक्षा असेल. कारण मुलांनी वाचते होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी समाजातील सर्व घटकांना त्यांच्या पातळीवर त्यांच्या परीने सहभाग नोंदवावा लागेल. वाचनाचे फायदे वेगळे सांगायला नकोत.

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि भाषा संवाद कौशल्याला चालना देणे, दर्जेदार साहित्य आणि लेखकांचा परिचय करून देणे अशी उद्दिष्टे या उपक्रमामागे असल्याचे सांगितले जाते. ती अशा एका उपक्रमाने सध्या होणे शक्य नाही, ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे हे प्रशासनही जाणून असू शकेल.

तथापि हा उपक्रम म्हणजे त्या दिशेने टाकलेले पाऊल असे मानले जाऊ शकेल का? एरवी शाळेच्या वेळापत्रकात मुलांना अवांतर वाचनासाठी किती वेळ मिळू शकतो हे कदाचित सारेच जाणून असतील. तथापि यानिमित्ताने तशी संधी मुलांना मिळू शकेल आणि मुले किमान वाचती होऊ शकतील, हेही नसे थोडके.

- Advertisment -

ताज्या बातम्या