उद्योगनगरी अशी नाशिकची देशात ओळख आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा नाशिकचा प्रवास आजही सुरूच आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण उद्योगपूरक आहे. तत्कालीन सिन्नरस्थित सारडा परिवाराने विडी उद्योग सुरू करून उद्योजकतेची मुहूर्तमेढ रोवली. आज जिल्ह्यात हजारो उद्योग सुरू आहेत. त्यांनी लाखो रोजगार निर्माण केले आहेत. अनेक शेतीपूरक उद्योगही फोफावत आहेत.
सुवर्ण त्रिकोणाचा नाशिक एक भाग आहे. अनेक मोठे उद्योग, त्यांना सुटे भाग पुरवणारे छोटे उद्योग, स्वतंत्र कल्पना घेऊन कार्यरत असणार्या असंख्य कंपन्यांनी मिळून बनलेल्या या उद्योगनगरीत उद्योगांचा परिघ विस्तारतच आहे. इलेक्ट्रिकल आणि वाहन उद्योगांना सुटे भाग पुरवणार्या उद्योगांचे नाशिक हब मानले जाते. उद्योजकांचा हा प्रवास प्रेरणादायी तर आहेच पण तो सतत आव्हानांनी भरलेला असतो. ज्याला उद्योजकांना सातत्याने सामोरे जाते लागते. उद्योजक आणि गिर्यारोहक यांची तुलना वावगी ठरू नये.
एव्हटेस्टचे शिखर गाठण्यासाठी गिर्यारोहकांना असंख्य संकटांचा सामना करावा लागतो. ते शिखर गाठले तरी अनेक नवनव्या मोहिमा त्यांना खुणावतात. नवनवी शिखरे गाठण्याची उर्मी निर्माण होते. उद्योजकांचा प्रवास त्यापेक्षा वेगळा नसतो. उद्योग यशस्वीपणे कार्यरत ठेऊन त्याचा विस्तार करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यशाची आणि शिखर गाठण्याची व्याख्या व्यक्तीगणिक बदलू शकते किंवा बदलते हे खरे. तथापि बदलत्या काळाचा आणि तंत्रज्ञानाचा वेध घेत उद्योगाचा चेहरा बदलणे सोपे नसतेच.
सामान्य माणसे संकटासमोर हात टेकू शकतात. हार मानू शकतात. ती मुभा उद्योजकांना नसतेच. कारण उद्योगावर हजारो घरे चालतात, याचेही भान सतत बाळगावे लागते. हा प्रवास असतो नवनवी स्वप्ने बघण्याचा. ती साध्य करण्यासाठी निरंतर प्रयत्नांचा. या उद्यमशीलतेची दखल आज ‘देशदूत’ घेत आहे. त्यांचा सन्मान करणार आहे. हा सत्कार आहे उद्योजकांमधील नेतृत्वगुणांचा, महत्त्वाकांक्षांचा, निर्भयतेचा, जोखीम घेण्याच्या निश्चयी वृत्तीचा, धैर्याचा, भविष्याचा वेध घेणार्या प्रगतिशील दृष्टिकोनाचा, आशावादाचा आणि ते घरोघरी निर्माण करत असलेल्या आनंदलहरींचा. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकांनी उद्यमशीलतेच्या वाटेवर पाऊल टाकावे हीच अपेक्षा.