ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्यकर्तृत्व समाज कधीही विसरणार नाही. समाजाला सतत विज्ञानाधिष्टीत विचार करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात प्रसिद्ध आहेत. ही थिअरी ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने ओळखली जाते. नारळीकर महान होतेच. विज्ञान आणि खगोल क्षेत्रातील कामाचा त्यांचा आवाका प्रचंड होता. तथापि त्याचे आकलन सगळ्याच सामान्य माणसांना होणार नाही. पण त्यातून सामान्य माणसांनी त्यांच्याही नकळत काय कमावले? विज्ञान आणि गणित हे विषय समाजाला नेहमीच क्लिष्ट आणि काहीसे गूढही वाटत आले.
पण ते समाजाला सहज समजावेत यासाठी त्यांनी कथालेखनाचा मार्ग अनुसरला. ललित ढंगाने कथा लिहून विज्ञान मनामनापर्यंत पोहोचवले. एका परिसंवादात त्यांना कथालेखनाची स्फूर्ती झाली. ‘कृष्णविवर’ ही त्यांची पहिलीच कथा. जी त्यांनी मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेला पाठवली होती. तिने प्रथम पारितोषिक पटकावले. गंमत म्हणजे कथालेखन कौशल्यविषयी साशंकता असल्याने त्यांनी ही कथा त्यांनी विनायक नारायण जगताप या टोपण नावाने लिहिली होती असे त्यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. तेव्हापासूनच त्यांचा कथालेखक म्हणून प्रवास सुरु झाला. त्यामुळेच समाजाला विज्ञान आणि गणितातील असंख्य संकल्पनांचा परिचय झाला.
‘गणितातील गंमतीजमती’ हे त्यांचे एक पुस्तक. गोळाफुलीचा खेळ, सात पूल आणि दोरीची गाठ, ओली आणि सुकी हे कथांचे मथळे त्यादृष्टीने पुरेसे बोलके आहेत. असे विपुल लेखन आणि संशोधन त्यांच्या नावावर जमा आहे. ज्यामुळे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदतच झाली. हा दृष्टिकोनच अंधश्रद्धांचा पराभव करू शकतो. ज्याची समाजाला नितांत गरज आहे. सिद्धहस्त लेखकांनी देखील विज्ञानकथा लेखन जरूर करावे. त्यासाठी वैज्ञानिकांशी चर्चा करावी. संकल्पना समजावून घ्याव्यात. विज्ञान विषयाची मनातील भीती काढून टाकून कथा लिहाव्यात असा आग्रह त्यांनी कायमच धरला. विद्यार्थी किंवा लहान मुले हा त्यांच्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला. म्हणूनच खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणजेच ‘आयुका’ या संस्थेत मुलांसाठी विज्ञान संशोधन केंद्र देखील उभारले.
या संस्थेची स्थापना त्यांनीच केली होती. मुले त्यांना थेट प्रश्न विचारू शकायची आणि तेही त्याला स्वहस्ताक्षरात उत्तरे पाठवायचे. ते मृदुभाषी होते पण त्यांचे मत किंवा म्हणणे ते परखडपणे मांडत. संशोधन किंवा शोधाविषयी दावे करणार्यांनी त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ वैज्ञानिक पुरावे जोडावेत असे ते ठामपणे म्हणत. पण वैज्ञानिक निकषांच्या पातळीवर दाव्यांची मीमांसा ज्यांना नको असेल अशा व्यक्तींना मनमानी पद्धतीने फक्त बोलू द्यावे अशी भूमिका त्यांनी कायमच जपली. मग ते दावे प्राचीन अथवा अर्वाचीन असे कोणत्याही कालखंडातील असोत, नारळीकर त्यांच्या भूमिकेवर नेहमी ठामच राहिले. प्रसंगी रोषही पत्करला. मराठी भाषेतूनच विज्ञानाला वाहिलेले विपुल लेखन त्यांनी केले. मराठी भाषा अडसर मानणार्यांपुढे त्यांनी त्यांचा आदर्श त्यांच्याही नकळत उभा केला होता. त्यांच्या नावावर असंख्य पुस्तके आणि मानसन्मान जमा आहेत. त्यात सरकारी पुरस्कार आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व ऋजू होते.
साधी राहाणी आणि उच्च विचारसरणीचा पुरस्कार करणारे होते. ते सामान्यांतील सामान्य होऊन राहणारे होते. संपर्कात येणार्या व्यक्तींकडूनही काही ना काही शिकत राहाणे हे त्यांचे एक स्वभाववैशिष्ट्य होते. नाशिकशी देखील त्यांचे ऋणानुबंध होते. नाशिकस्थित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदा गौरव’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. नाशिकला भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते संमेलनाला उपस्थित राहू शकले नव्हते पण त्यांचे लिखित भाषण गाजले होते. ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसनजी सारडा आणि त्यांचा विशेष स्नेह होता. जयंतराव व सौ. मंगला नारळीकर नाशिकला आले की सारडा परिवाराकडे आवर्जुन भेट द्यायचे. या दोन्ही कुटुंबीयांचा एकमेकांविषयीचा चांगला जिव्हाळा होता. देवकिसनजी आणि जयंतराव या दोन विद्वत्ताप्रचुर अभ्यासकांमधील चर्चा नेहमीच श्रवणीय तर असायचीच पण मार्गदर्शकही ठरायची. असे प्रेरणादायी आणि आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.