Thursday, November 21, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २१ नोव्हेंबर २०२४ - चांगला माणूस घडणे महत्वाचे

संपादकीय : २१ नोव्हेंबर २०२४ – चांगला माणूस घडणे महत्वाचे

नुकताच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस जगातील देशात आणि बालदिवस भारतात साजरा झाला. ‘शाश्वत जगासाठी भविष्यातील नेत्यांचे सक्षमीकरण’ ही यावेळच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाची संकल्पना आहे. ती साध्य करण्याच्या प्रक्रियेत कौशल्य, ज्ञान आणि मूल्यांचे महत्त्वदेखील समाविष्ट आहे. ज्यात शाळा आणि पालकांची महत्त्वाची भूमिका अपेक्षित आहे. सध्या विद्यार्थी फक्त परीक्षार्थी बनत असावेत का? अभ्यास करून घेणे हे शाळांचे काम आहेच. त्याबरोबरीने चांगला माणूस घडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

मूल्ये रुजवणे, विविध प्रकारच्या कौशल्यांचा विकास करणे, त्यांची आवड कोणती, ते कोणते काम मनापासून करू शकतात याची ओळख त्यांना करून देणे हा त्या प्रक्रियेचाच एक भाग मानला जाऊ शकेल. विद्यार्थ्यांना कोणते काम मनापासून करावेसे वाटते ते ओळखण्यासाठी मदत करणे हे शिक्षणाचे एक कार्य आहे, असे तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती म्हणतात. त्यामागचा उद्देशदेखील हाच असेल. विद्यार्थी फक्त परीक्षार्थी बनतात, घोकंपट्टी करून उत्तीर्ण होतात अशी टीका सातत्याने केली जाते. करिअर घडणे आयुष्याचा अपरिहार्य भाग आहेच. तथापि करिअरच्या पलीकडेदेखील एक आयुष्य असते. ते आनंदाने जगणे हेदेखील शिकवण्याचा आणि शिकण्याचा एक भाग आहे. ज्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये योग्य वयात रुजवली जायला हवी.

- Advertisement -

विद्यार्थी समाजाचा एका घटक असतात. समाजात वावरायचे कसे, संवाद कसा साधायचा, बंधुभाव कसा जपायचा, आदर राखणे, नीतिमत्ता, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणे, खरे बोलणे याचे संस्कार गरजेचे असतात. या गुणांनी युक्त व्यक्ती चांगला माणूस म्हणून गणला जातो. अन्यथा करिअरमध्ये यशस्वी पण सामाजिक वर्तन मात्र आक्षेपार्ह असे योग्य ठरेल का? अशा व्यक्ती समाजात आढळतात पण समाज त्यांची संभावना उद्धट, अहंकारी अशीच करतो. शिक्षणातून वैचारिक दृष्टिकोन विस्तारणे अपेक्षित आहे.

स्पर्धा निकोप असावी, अपयशातून शिकता येते, सर्वांचे यश स्वीकारण्याची क्षमता, सहवेदना विद्यार्थी त्यातून आपोआप शिकत जाऊ शकतील. चांगला माणूस घडण्यात पालकांचा सक्रिय सहभाग अपरिहार्य आहे. याची जाणीव पालकांनादेखील असायला हवी. अन्यथा ती शाळेची जबाबदारी आहे, असा दृष्टिकोन आढळतो. सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांमध्येच भविष्यातील नेतृत्व दडलेले असते. त्याला योग्य वयात खतपाणी घालणे मात्र गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाच्या संकल्पनेचा एक अर्थ तोदेखील आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या