Monday, October 21, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : २१ ऑक्टोबर २०२४ - कौटुंबिक बेबनाव चिंताजनक

संपादकीय : २१ ऑक्टोबर २०२४ – कौटुंबिक बेबनाव चिंताजनक

उच्च शिक्षितांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष कौटुंबिक व्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर अलीकडच्या काळात पार पडलेली विविध सर्वेक्षणे नोंदवतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात देखील कौटुंबिक अस्वस्थतेचे प्रतिबिंब उमटल्याचे वृत्त माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होते. ‘हे विश्वची माझे घर’ अशी संस्कृती जोपासल्याचा अभिमान बाळगणार्‍या समाजाला ही स्थिती भूषणावह नक्कीच नाही. कारण कौटुंबिक बेबनावाचे व्यापक दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतात.

घटस्फोटांचा मुद्दा चर्चिला गेला म्हणून त्याचे निष्कर्ष चर्चिले जातात. तथापि एकूणच सगळ्याच नातेसंबंधांमध्ये बेबनाव आढळतो. कौटुंबिक बेबनावाचे आणि संवादाच्या अभावाचे विपरीत परिणाम आढळतात. त्यामुळे अडनिड्या वयाची मुले टोकाला जातात. अनेक मुले घर सोडून जातात. काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आई-वडिलांच्या विभक्त होण्यात त्यांच्या मुलांचा काहीही हातभार नसताना ते त्या बेबनावाचे बळी ठरतात. घटस्फोटित अनेक जोडप्यांची मुले एकलकोंडी होतात. त्यांचा भावनिक कोंडमारा होतो. एकल पालकत्व अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरू शकते.

- Advertisement -

कौटुंबिक वीण अशी उसवत का चालली असावी? त्याचे परिणाम आढळत असतांनाही तो बदल चिंतेचा का वाटत नसावा? कौटुंबिक समजूतदारपणाचा अभाव का वाढत असावा? कुटुंबातील सदस्यांच्या तणावाची कारणे वेगवेगळी असू शकतील. तथापि कुटुंब म्हणून एकमेकांप्रती आदर, प्रेम, जिव्हाळा आणि समजून घेण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे असे जाणत्यांचे निरीक्षण आहे. स्वप्रतिमेवरचे प्रेम किंवा त्यांची जाणीव टोकाला जात आहे का? माझेच बरोबर याचा अट्टाहास वाढत चालला असावा का? माणसे स्वतःवर प्रेम करायला विसरत चालली असावीत का? जसे आहोत तसा स्वीकार करत नसावीत. विविध पातळ्यांवर स्वतःला जोखण्याची सवय जडत चालली असावी का? असे अनेक प्रश्न अस्वस्थ करणारे ठरतात. ज्याचा विचार प्राधान्याने केला जाण्याची आवश्यकता आहे.

स्वतःचा आदर करायला, स्वतःवर प्रेम करायला न शिकणार्‍या माणसांना इतरांची तीच भावनिक गरज लक्षात येत नसेल तर ते स्वाभाविक मानले जाऊ शकेल. कुटुंब संयुक्त असो किंवा छोटे, संस्कारांचे महत्त्व तेवढेच आहे. स्वतःवर प्रेम करणे, त्यात ज्येष्ठांनी बदल सुचवले तर त्यातील तथ्य समजून घेणे, आदर देणे, दुसर्‍याची भूमिका आधी समजून घेणे, प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे अशा अनेक मुद्यांचा त्यात समावेश होऊ शकेल. जे कौटुंबिक वीण घट्ट राखण्यात मोलाची भूमिका बजावतात. तात्पर्य कौटुंबिक विसंवादाची अशी अनेक कारणे सांगितली जाऊ शकतात. ज्याचा एकत्रित विचार करून समाजाच्या वाटचालीला दिशा देण्याचे प्रयत्न जाणत्यांना करावे लागतील. ज्यांना याची जाणीव आहे अशा व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या पातळीवर पुढाकार घ्यायला हवा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या