Friday, January 23, 2026
Homeसंपादकीयआनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे

आज लक्ष्मीपूजन! पाच दिवस चालणार्‍या दिवाळीच्या महा उत्सवातील मुख्य दिवस. लक्ष्मीची कृपा कायम राहावी अशी कामना ठेवून घरोघरी आज लक्ष्मीची आराधना केली जाईल. दिवाळीच्या दिवसांच्या अनेक पुराणकथा सांगितल्या जातात. कोणत्याही परिस्थितीत माणसे जसा जमेल तसा, ज्याला ज्या पद्धतीने शय होईल त्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात. कारण दिवाळी म्हणजे आनंदी आनंद गडे.. असेच वातावरण सभोवताली असते. याच काळात नवीन धान्य घरी येते म्हणून शेतकरी खुश. बोनसरूपी पैसा मिळतो म्हणून कामगार खुश. नवीन कपडे, फटाके मिळतात आणि शाळा-अभ्यासाची कटकट नसते म्हणून बच्चे कंपनी खुश. सगळे मनासारखे झाले म्हणून गृहिणी खुश.

- Advertisement -

बाजार गर्दीने ओसंडून वाहातो म्हणून व्यापारी-व्यावसायिक खुश. असा दिवाळीचा सण म्हणजे सगळा खुशीचा मामला असतो. याच काळात काहींच्या आनंदाचा परीघ विस्तारतो. ते वंचितांची दिवाळी साजरी करतात. दिवाळीच्या उत्साहात त्यांना सहभागी करून घेतात. फराळ, फटाके त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. अनेकजण पाड्यांवर दिवाळी साजरी करतात. अभावग्रस्तांच्या घरी एक तरी पणती पेटण्याचे ते निमित्त ठरतात. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सीमेवरील सैनिकांना फराळाचे पाठवले जाते. दिवाळीनिमित्त त्यांच्या आनंदाचा प्रवास व्यक्ती ते समष्टी असा होतो. ‘आदमी हूं आदमीसे प्यार करता हूं’ असेच त्यांच्या कामाचे वर्णन केले जाऊ शकेल. आनंद जितका वाटाल तितका तो वाढतो, याची अनुभूती माणसे दिवाळीत घेतात. संवेदना, सहवेदना, भावनाप्रधानता, साहचर्य, बंधुता, मैत्री ही मानवी मूल्ये यानिमित्ताने दृगोच्चर होतात. ही मूल्ये माणूसपण अधिकाधिक सखोल रुजवतात. माणूसपण जपण्याची शिकवण दिवाळी देते. युवा पिढीसमोर आदर्श निर्माण व्हायला असे उपक्रम पूरकच ठरतात.

YouTube video player

कितीही समस्या असल्या तरी दिवाळीचे चार दिवस माणसे, मग ती श्रीमंत असो की गरीब, आनंदात राहायचा प्रयत्न करतात. ‘सणासुदीला नको दुःखाच्या आणि संकटांच्या गोष्टी’ असा संवाद घरोघरी आढळतो. दिवाळीत माणसे आनंद मानायला शिकतात. त्या अर्थाने दिवाळी वर्तमानात राहायला शिकवते असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. अन्यथा, एरवी माणसे भूतकाळाचे ओझे बाळगतात किंवा भविष्यकाळाच्या चिंतेने अस्वस्थ असतात. काय होईल, कसे होईल हाच विचार सतत करतात. पुढचा विचार करता करता आजचे जगणे प्रभावित होते. हे माणसांच्या लक्षातच येत नाही इतकी माणसांना त्याची सवय होते. पण दिवाळी मात्र वर्तमानाचा वसा देते. जो सुफळ संपूर्ण माणसेच करू शकतात. कारण एक तत्ववेत्ता म्हणतो, आनंदाचा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच मार्ग आहे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे. परमेश्वराने ती तुम्हाला दिलेली अनमोल भेट आहे असे तत्वज्ञानातील जाणकार सांगतात. जन्म माणसाच्या हातात नसला तरी आयुष्य कसे घालवायचे हे माणूस नक्कीच ठरवू शकतो असे मंगेश पाडगावकर त्यांच्या एका कवितेतून सुचवतात. ‘सांगा कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत?’ तुम्हीच ठरवा, असे सांगून ते त्याचा मार्गही त्याच कवितेतून दाखवतात. जो कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो.

एकदा का ही वृत्ती रुजली की, आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे, वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे, नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहिकडे..असा स्वभावच बनतो. अशी माणसे परिस्थितीचा स्वीकार करायला शिकतात. प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद द्यायला शिकतात. मग आनंदाला निमित्त लागत नाही. मनासारखे काम होणे, निसर्गाच्या सानिध्यात रमणे, आवडीनुसार छंद जोपासणे, मनासारखा पदार्थ तयार करणे, पसारा आवरणे, पायी चालणे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून माणसे आनंद मिळवायला शिकतात. हे लहानसहान आनंद विनाकारण तणावाच्या जीवनातून मुक्तता देतात.

जीवन म्हणजे नेमके काय आहे ते शिकवतात. अशावेळी आपण काय गमावत होतो याचेही भान येते. मन आनंदी राहण्याचे कारण ते स्वतःच असतात हे माणसांना उमगते. युवा पिढीच्या भाषेत ‘माइंडफूल’ जगणे यालाच म्हणत असावेत. लक्ष्मीपूजनाचा भावार्थ माणसांना हेच शिकवतो. आजच्या दिवशी माणसे समृद्धी, ऐश्वर्य, शांती प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन श्रद्धेने करतात. सजग जगणे त्याला पूरकच ठरू शकेल. असे आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला यावेत याच सर्वांना शुभेच्छा.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य?

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री...