समाजात भेदाभेदाच्या भिंती उंच होत असतांना हसण्यामध्ये मात्र अजून जातधर्म आलेला नाही अशी टिप्पणी अभिनेते संदीप पाठक यांनी केली. ते विनोदी नट म्हणूनही ओळखले जातात. म्हणून त्यांच्या टिप्पणीची संभावना विनोदी म्हणून करणे योग्य ठरणार नाही. त्यांनी एका अर्थाने समाजातील वास्तव मांडले आहे. समाजात भेदाभेद आहेत. परिणामी अधूनमधून सामाजिक तणाव निर्माण होतो. कधी काय होऊ शकेल या भावनेने सामान्य माणसांची मने कायमच तणावात असू शकतील का? त्याचा एक परिमाण म्हणून माणसे हसणे विसरत चालली असावीत का? हसण्याचा एक ठळक सामाजिक परिणाम सगळेच जाणून असतील.
कोणत्याही प्रकारच्या हसण्यामुळे माणसांचा परिचय होऊ शकतो. ओळख नसतांनाही एकमेकांकडे बघून स्मित हास्य करणारी माणसे नंतर एकमेकांशी परिचित होऊ शकतात. त्यांच्यात सामाजिक बंध निर्माण होऊ शकतात. हेच बंध सामाजिक मैत्रीचा मार्ग प्रशस्त करतात. हसणे माणसांना क्षणभरासाठी का होईना प्रसंगी स्वतःला देखील विसरायला लागू शकते. म्हणजेच त्या क्षणाला माणसे परस्पर भेदही विसरत असू शकतील का? पण माणसे सहज हसणेच विसरत चालली असावीत का? हास्याची मैफल आता फारशी भरत नसावी का? खळखळून एकमेकांच्या हातावर टाळी देत हास्य मैफल रंगवणारे मित्रांचे कट्टे फारसे आढळत नाहीत.
किंबहुना दोन व्यक्ती जोरात हसल्या तर अन्य माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहतांना आढळू लागली आहेत. वास्तविक हसण्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी देखील जवळचा संबंध आहे. हसण्याने मेंदूतून एन्डोरफीन स्त्रवते. जे आनंदाचे संप्रेरक (हॅपी हार्मोन) मानले जाते. जे स्त्रवले की माणसांना छान वाटते. उत्साह वाढतो. हसणे ताण विसरायला लावते. वेदना कमी होऊ शकतात. चेहर्याच्या स्नायूंचा,श्वसनाचा, हृदय आणि फुफ्फुसांचा व्यायाम होतो. हसण्याची जादू अशी की, समोरच्या व्यक्तीला ते तसाच प्रतिसाद द्यायला प्रवृत्त करते. भाग पाडते असे म्हणा ना. कोणत्याही प्रकारे हसले तरी चालेल पण माणसांनी हसले पाहिजे. कारण हसणारा चेहरा समोरच्या व्यक्तीच्या चेहर्यावरही आपसूकच हसू फुलवतो. वातावरण प्रसन्न करतो. तेव्हा हसण्यासाठी जन्म आपुला हेच खरे.