Sunday, October 6, 2024
Homeसंपादकीयसंपादकीय : २२ जून २०२४ - जशी मायभूमी तशी मातृभाषा

संपादकीय : २२ जून २०२४ – जशी मायभूमी तशी मातृभाषा

मातृृभाषेतून शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मातृभाषेतून शिकल्याने मुलांना विषयाचे स्पष्ट आकलन होते. बहुभाषिक असण्याचा अर्थ दुसर्‍या भाषेतून शिकणे असा होत नाही. अन्य भाषा शिकणे हा त्याचा अर्थ आहे असे मत राष्ट्रीय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक दिनेश सकलानी यांनी माध्यमांकडे व्यक्त केले.

ओडिसा भागातील दोन आदिवासी भाषांमध्ये आणि आगामी काळात 121 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. त्यामागचा उद्देशदेखील तोच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी शाळांमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मातृभाषेतून शिक्षण यावर सातत्याने विचारमंथन सुरूच असते. मातृभाषेतून का शिकावे हे निदान शहरी भागातील पालक नक्की जाणून असतील. मूल पहिला शब्द त्याच्या मातृभाषेतूनच उच्चारते. त्याच्या कुटुंबात आणि अवतीभवती तीच भाषा बोलली जाते.

- Advertisement -

मातृभाषेशी त्याचा आईच्या पोटात असतानापासूनच ऋणानुबंध जुळलेला असतो असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्याच भाषेत त्याने शिक्षण घेणे ही खरे तर आपसूकच घडणारी प्रक्रिया आहे. याआधी घडतही होती. तथापि अचानक पालकांचा इंग्रजी भाषेकडे ओढा वाढत चालल्याचे आढळू लागले आणि मातृभाषेतून शिकण्याचा-शिक्षणाचा मुद्दा विचारमंथनाचा बनला. इंग्रजी भाषा जागतिक भाषा मानली जाते. त्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी पालकांना ती भाषा खुणावू शकते हेही एकवेळ समजण्यासारखे आहे. तथापि विद्यार्थी दशेत मुलांना विविध विषयांचे आकलन होणे, संकल्पना स्पष्ट होणे आणि शिकण्याची प्रक्रिया सहजपणे पार पडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मातृभाषा हेच शिकण्याचे माध्यम हवे. पायाच भुसभुशीत राहिला तर त्यावर उभी राहणारी भविष्याची इमारत पक्की असू शकेल का? हेच कदाचित सकलानी यांनाही सुचवायचे असावे.

मराठी माध्यमांच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवली जाते. मराठीतून शिकताना ती भाषादेखील मुले आपलीशी करू शकतात. त्यांच्यात ती क्षमता असते. इंग्रजी भाषेची गोडी लावून त्या भाषेचे आकलन वाढवले जाणे शक्य आहे. मराठी माध्यमात शिकून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भविष्य उज्ज्वल करणारी अनेक उदाहरणे लोकांच्या अवतीभवती असतात. सक्षम आणि बहुभाषी पिढी घडवण्यासाठी आणि शिकणे आनंददायी होण्यासाठी सरकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. विविध भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यात त्यावर भर देण्यात आल्याचे सांगितले जाते. गरज आहे ती पालकांनी साथ देण्याची. भविष्याच्या भीतीने मुलांचे शिकणे आनंददायी होणे पालक नाकारणार नाहीत आणि मातृभाषेतून सहज शिकण्याची संधी मुलांना देतील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या